मंत्रिपदाचा दबदबा चालला नाही! राजस्थानमध्ये झाबर सिंह खर्रा यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांचा पराभव

भाजपला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला असतानाच पक्षातील बड्या नेत्यांच्या कुटुंबीयांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Untitled Design   2026 11 21T193149.422

Untitled Design 2026 11 21T193149.422

Major setback for BJP in Rajasthan Panchayat Samiti elections : राजस्थानमधील पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. राज्यात एकीकडे भाजपला अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला असतानाच पक्षातील बड्या नेत्यांच्या कुटुंबीयांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थानचे नगरविकास आणि स्वायत्त शासनमंत्री (यूडीएच) झाबर सिंह खर्रा यांच्या संपूर्ण कुटुंबालाच मतदारांनी नाकारले आहे. त्यांच्या पत्नी शांती देवी आणि दोन्ही मुलांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, पत्नी आणि एक मुलगा भाजपच्या तिकिटावर, तर दुसरा मुलगा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरला होता. मात्र, तिघांनाही विजय मिळवता आला नाही.

सीकर जिल्ह्यातील श्रीमाधोपूर आणि अजितगड पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. या दोन्ही पंचायत समित्यांवर काँग्रेसने विजय मिळवल्याने स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढल्याचे चित्र आहे. या निकालांमुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. अजितगड पंचायत समितीच्या वॉर्ड क्रमांक 17 मधून मंत्री झाबर सिंह खर्रा यांच्या पत्नी शांती देवी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होत्या. ही जागा मंत्री खर्रा यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारले. शांती देवी यांचा अवघ्या 51 मतांनी पराभव झाला. त्यामुळे मंत्र्यांच्या कुटुंबाला बसलेल्या पराभवाच्या धक्क्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बिटकॉइन मध्ये मोठी घसरण! दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर किंमत, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले

मंत्री खर्रा यांचा मोठा मुलगा दुर्गा सिंह खर्रा श्रीमाधोपूर पंचायत समितीच्या वॉर्ड क्रमांक 19 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होता. मात्र, त्यालाही विजय मिळवता आला नाही. तर दुसरा मुलगा अजय सिंह खर्रा भाजपच्या तिकिटावर वॉर्ड क्रमांक 20 मधून निवडणूक रिंगणात होता. कल्याणपुरा थोई ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या या वॉर्डमध्ये काँग्रेसचे भैरूलाल वर्मा यांनी बाजी मारली. त्यांनी अजय सिंह खर्रा यांचा 60 मतांनी पराभव केला. अशा प्रकारे मंत्र्यांच्या कुटुंबातील तिन्ही उमेदवारांना मतदारांनी पराभूत केले.

भाजपला सीकर जिल्ह्यात आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषदेच्या वॉर्ड क्रमांक 48 मधून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षा इंद्रा चौधरी यांचाही पराभव झाला आहे. एकीकडे मंत्र्यांच्या कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा पराभव आणि दुसरीकडे पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षांना मिळालेली हार, यामुळे सीकर जिल्ह्यात भाजपची मोठी राजकीय कोंडी झाल्याचे चित्र आहे.

पुण्यात डॉक्टरांच्या भरतीचा मोठा घोटाळा! 11 डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तीन डॉक्टरांवर गंभीर आरोप

दरम्यान, जयपूरमधील झोटवाडा पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. हा मतदारसंघ राज्याचे उद्योगमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, येथील पंचायत समितीच्या एकूण 15 जागांपैकी भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. त्यामुळे या निकालाने भाजपच्या स्थानिक राजकीय वर्चस्वाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

एकूणच, राजस्थानमधील पंचायत समिती निवडणुकीचे निकाल भाजपसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. विशेषतः मंत्री झाबर सिंह खर्रा यांच्या कुटुंबाचा झालेला पराभव आणि झोटवाड्यातील खराब कामगिरीमुळे पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Exit mobile version