कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) ममता बॅनर्जींच्या (Mamata Banerjee) सरकारने अदानी समूहाला मोठा धक्का दिला आहे. अदानी समूहाकडे (Adani Group) असलेला 25 हजार कोटी रुपयांचा प्रकल्पाच्या पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. अदानी समूहाला हा मोठा धक्का मानला जात आहे. याशिवाय केंद्रातील सत्ताधारी भाजपलाही इशारा असल्याचे सांगितले जात आहे. (Mamata Banerjee’s government in West Bengal has withdrawn the Rs 25 thousand crore project from the Adani Group)
मागील काही दिवसांपासून तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या कॅश फॉर क्वेरी प्रकल्पामुळे चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. या प्रकरणावरुन भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा वाद रंगला होता. शिवाय तृणमूलच्या अनेक नेते ईडीच्या कचाट्यात अडकले आहेत, तर काही जण रडारवर आहेत. या संपूर्ण प्रकरणावर शांत असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यातील जवळकतेवर विरोधक अनेकदा टीका करत असतात. महुआ मोईत्रा यांच्यावरही अदानींना अडचणीत आणणारे प्रश्न लोकसभेत विचारण्यासाठी पैसे घेतल्याचे आरोप भाजपने केले आहेत. मात्र आता अदानी यांनाच धक्का देत ममता बॅनर्जी यांनी शांत राहून एका दगडात दोन पक्षी मारले असल्याचे सांगितले जात आहे.
इंडिया टुडेशी संबंधित इंद्रजित कुंडू यांच्या मते, पश्चिम बंगालमधील ताजपूर बंदर विकसित करण्यासाठी अदानी समूहाला 25 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प देण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकल्पाची लवकरच सुधारित निविदा जारी केली जाईल, अशी घोषणा केली आहे.
यापूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी बंगाल ग्लोबल बिझनेस समिट 2022 मध्ये भाग घेतला होता. येथे त्यांनी 10 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. दोन महिन्यांनंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, ममता बॅनर्जी यांनी स्वत: LOI (लेटर ऑफ इंटेंट) अदानी पोर्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी यांना कोलकाता येथे सुपूर्द केले होते. त्यानंतर हा प्रकल्प अदानी समूहाकडे सोपवण्यात आला होता
ममता बॅनर्जी यांनी या प्रकल्पाची जबाबदारी अदानी समूहाकडे दिल्यावर त्यावर बरीच चर्चा झाली. एकीकडे विरोधक अदानी समूहावर हल्लाबोल करत असतानाच, दुसरीकडे ममता बॅनर्जी सरकार मोठ्या प्रकल्पांची कामे त्याच समूहाकडे सोपवत असल्याने इंडिया आघाडीतील पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती.