Manipur Violence : देशाच्या ईशान्य भागातील मणिपूर तीन महिन्यांपासून धुमसत आहे. जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिलांवरील अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. मणिपुरात तणाव वाढला. आता मणिपूरमधील मोरेह जिल्ह्यात अज्ञात समाजकंटकांनी रिकाम्या घरांना आगी लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील अनेक दिवसांपासून ही घरे बंद होती. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण म्यानमारच्या सीमेला लागूनच आहे.
मणिपूर मुद्द्यावरून विरोधकच पळ काढताहेत, सरकार चर्चेसाठी तयार; भाजपची टीका
राज्यातील कांगपोकपी जिल्ह्यात हल्लेखोरांनी सुरक्षा दलाच्या वाहनांनाही आग लावली. या घटनेत कोणीही जखमी अथवा मृत्यूमुखी पडलेले नाही. सापोरमेईना येथे काही स्थानिक लोकांनी मणिपूरच्या नंबर प्लेट असलेल्या बस रोखल्या होत्या. त्यानंतर या बसमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. यामध्ये अन्य समुदायाचे कुणी नाही ना, याची खात्री करण्यात आली.
मणिपूरमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांनी देखील लोकसभा आणि राज्यसभेत मणिपूर मुद्द्यावर चर्चे करण्याची मागणी केली. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बुधवारी मणिपूर मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर चांगल्याच भडकल्या. काँग्रेस मणिपूर हिंसाचाराची वस्तुस्थिती लपवत असल्याचा आरोप करत राहुल गांधींनीच मणिपूरमध्ये आग लावल्याचं मोठं वक्तव्य त्यांनी केलं.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूरच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज पुन्हा पुन्हा तहकूब करावे लागले. या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी लोकसभेत बोलतांना सांगितलं की, मी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून मणिपूर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्यांचे बहुमोल सहकार्य मागितले आहे. सरकार मणिपूरवर चर्चेसाठी तयार आहे. आणि त्यांना या संवेदनशील विषयावर चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्याचे आवाहन केले आहे.