Manipur Violence : मणिपूरमध्ये उसळलेला हिंसाचाराचा (Manipur Violence) आगडोंब आता शांत होताना दिसत आहे. या हिंसाचाराचा सर्वाधिक फटका येथील सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. या संकटातून मणिपुरी जनता सावरत असतानाच आणखी एक मोठे संकट त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे. येथे महागाई (Inflation) प्रचंड वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव अतोनात वाढले आहेत. राजधानी इंफाळमध्ये एक लीटर पेट्रोलसाठी तब्बल 300 रुपये मोजावे लागत आहेत. दुसरीकडे भाजीपाल्याच्या दरात तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या संकटाच्या काळात काळा बाजारही सुरू झाला आहे.
3 मे रोजी मणिपुरात हिंसा सुरू झाली होती. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी येथे अर्धसैनिक दल तैनात करण्यात आले. आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र, जीवनावश्यत वस्तूंचा पुरवठा प्रभावित झाला आहे. त्यामुळे लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे पेट्रोल चढ्या दराने विकले जात आहे. काळ्या बाजारात एक लिटर पेट्रोलसाठी 270 ते 300 रुपये द्यावे लागत आहेत. डिझेलसाठी 200 रुपये द्यावे लागत आहेत. हिंसेच्या घटना कमी होत असल्याने येथील कर्फ्यू शिथील केला जात आहेत. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. राज्यात फळे, भाजीपाला, मासे आणि अन्य खाद्य पदार्थांचे दर प्रचंड वाढले आहेत.
दरम्यान, मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी सोमवारी काही काळ संचारबंदी शिथिल केली आहे. लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना दिसत होते. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशने लोकांना बाहेर काढण्यासाठी विशेष उड्डाणे चालवली आहेत. याशिवाय राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडच्या सरकारनेही बचावासाठी पावले उचलली आहेत.
Video : माजी पंतप्रधान देवेगौडांशी नाथाभाऊंचं सख्य जुळलं कसं?
इम्फाळमधून बाहेर पडण्यासाठी फ्लाइट हा सर्वोत्तम पर्याय आहे. अशा स्थितीत इम्फाळ-कोलकाता मार्गावरील विमान भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांसाठी सर्व उड्डाणे आरक्षित आहेत. भाडे 30,000 रुपयांपर्यंत पोहोचले.