मणिपूर हिंसाचार ! 60 लोकांचा मृत्यू तर 1700 घरं जळून खाक…

Untitled Design   2023 05 09T073252.830

Manipur Violence Latest Update: मणिपूर मध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 60 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. दरम्यान वाढता हिंसाचार पाहता प्रशासनाकडून हिंसाचारग्रस्त भागातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मणिपूरमधील मैतेई समूदायाच्या एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीला विरोध करण्यावरुन झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत मणिपूरमध्ये 1700 घरं पेटवून देण्यात आली आहे. यामुळे बेघर झालेल्या नागरिकांनी शिबिरांमध्ये आश्रय घेतलाय. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.

दरम्यान मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी सोमवारी काही काळ संचारबंदी शिथिल केली आहे. लोक जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना दिसत होते. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशने लोकांना बाहेर काढण्यासाठी विशेष उड्डाणे चालवली आहेत. याशिवाय राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडच्या सरकारनेही बचावासाठी पावले उचलली आहेत. इम्फाळमधून बाहेर पडण्यासाठी फ्लाइट हा सर्वोत्तम पर्याय आहे. अशा स्थितीत इम्फाळ-कोलकाता मार्गावरील विमान भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील काही दिवसांसाठी सर्व उड्डाणे आरक्षित आहेत. भाडे 30,000 रुपयांपर्यंत पोहोचले.

मुख्यमंत्र्यांनी दिली परिस्थितीची माहिती
मणिपूरमध्ये उफाळून आलेला हिंसाचार यामुळे वित्तहानीसह जीवितहानी देखील झाली आहे. याबाबात बोलताना मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह म्हणाले, या हिंसाचारात आतापर्यंत 60 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला असून 231 लोक जखमी झालेत. तर या हिंसाचारात सुमारे 1700 घरे जळून खाक झाली आहेत. हिंसाचारामुळे बेघर झालेल्या लोकांना आपापल्या ठिकाणी पोहोचवण्याचे कामही सुरू झाले आहे.

मणिपूरात पोलीस बंदोबस्त तैनात
लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त भागात फ्लॅग मार्च काढला. लष्कराचे ड्रोन आणि हेलिकॉप्टर गस्त घालत आहेत. संरक्षण विभागाने सांगितले की, आतापर्यंत विविध समुदायातील सुमारे 23,000 लोकांची सुटका करून त्यांना लष्करी छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. मणिपूरमध्ये निमलष्करी दल आणि केंद्रीय पोलीस दलातील सुमारे 10,000 जवानही तैनात करण्यात आले आहेत.

Tags

follow us