Maratha Empire NCERT : ज्या मराठा साम्राज्याच्या घोडदळाच्या टापांनी दिल्लीच्या तख्तापासून ते अफगाणिस्तानच्या सीमांपर्यंत थरकाप उडाला… ज्या साम्राज्याने अटकेपार झेंडा फडकवून भारताची मान जगात उंच केली, त्याच साम्राज्याचा नकाशा चक्क 8 वीच्या शालेय पाठ्यपुस्तकातून गायब झाला आहे! होय, NCERT ने केलेल्या या बदलामुळे आता संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.
या वादात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे थेट वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी उडी घेतली आहे. त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून आपला तीव्र संताप व्यक्त केलाय. राजेंनी ठणकावून सांगितलंय की, हा केवळ एका नकाशाचा किंवा प्रादेशिक अभिमानाचा विषय नाही, तर हा भारताच्या ‘राष्ट्रीय ऐतिहासिक अखंडतेचा’ विषय आहे. पुराव्याशिवाय नकाशा वगळणे म्हणजे इतिहासाशी केलेली प्रतारणा आहे.
NCERT ने पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा कोणतेही ठोस कारण न देता वगळला आहे. ही मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाची व राष्ट्र रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची प्रतारणा आहे.
मराठ्यांचे प्रभुत्व संपूर्ण देशावर होते, याबाबतच्या समकालीन पुराव्यांसह इतिहासकरांनी भाष्य केलेले… pic.twitter.com/23XdEb6ZUr
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) April 13, 2026
इतिहासाची पाने उलटली तर काय दिसतं? तर, १७५८ पर्यंत मराठ्यांचा प्रभाव आजच्या पाकिस्तानातील ‘जमरुद’पर्यंत होता. हे आम्ही नाही, तर जेम्स रेनेल आणि रॉबर्ट विल्किन्सन यांसारख्या परदेशी नकाशाकारांनी त्यांच्या दस्तऐवजांत नोंदवून ठेवलंय. मग NCERT ला हे वास्तव का दिसत नाही.
वाद आहे तो राजस्थानमधील मराठा प्रभावाचा. पण इतिहास सांगतो की, बुंदी, कोटा आणि मारवाड यांसारख्या राजपूत राज्यांनी मराठ्यांना ‘चौथ’ म्हणजे कर भरला होता. १८७९ च्या ‘राजपुताना गॅझेटियर’मध्ये शिंदे, होळकर आणि गायकवाड या मराठा घराण्यांच्या प्रभावाचे स्पष्ट पुरावे आहेत. मग तरीही नकाशातून हा भाग का वगळला गेला.
‘अधिपत्य’ की ‘अधिसत्ता’? इतिहासकारांमध्ये मतभेद
मराठ्यांचे राजस्थानमधील वर्चस्व नेमके कसे होते, यावर इतिहासकारांमध्ये आजही भिन्न मते आहेत. बीबीसी मराठीने काही महिन्यांपूर्वी यावर सविस्तर प्रकाश टाकला होता. ज्यात काहींच्या मते मराठा सत्ता ही केंद्रीकृत साम्राज्यापेक्षा “विकेंद्रित करसंकलन व्यवस्था” होती.
याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रा. राहुल मगर यांच्या मते, मराठा प्रशासन ‘कमाविशी’ आणि ‘सरंजामी’ अशा दोन भागात विभागलेले होते. जरी संपूर्ण राजपुताना थेट प्रशासनाखाली नसला, तरी त्या काळात मराठ्यांच्या तोडीची दुसरी कोणतीही राजकीय शक्ती भारतात नव्हती, हे वास्तव आहे. तर, मराठा ही एक विकेंद्रित सत्ता होती. त्यांनी राजस्थानमध्ये थेट राज्य करण्याऐवजी तिथल्या अंतर्गत कलहात हस्तक्षेप करून ‘चौथ’ किंवा ‘सरदेशमुखी’ गोळा करण्यावर भर दिला. हे वर्चस्व मुघलांसारख्या पूर्ण राजकीय अधिसत्तेपेक्षा वेगळे होते असे दिल्ली विद्यापीठातील प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांचं मत आहे. तर, मराठ्यांचे वर्चस्व हे ‘अधिसत्ता’ होते. कागदोपत्री राजपूत राजे मुघलांच्या अधीन असले, तरी प्रत्यक्षात मराठेच मुघल बादशहाच्या वतीने संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार आणि खंडणी वसुली करत होते असे मत जेष्ठ इतिहासकार जयसिंगराव पवार यांनी बीबीसी मराठी बोलताना व्यक्त केले होते.
इतिहासकारांमध्ये तांत्रिक मतभेद असू शकतात, परंतु मराठ्यांच्या सामर्थ्याबद्दल आणि भौगोलिक व्याप्तीबद्दल शंका घेण्याची हिंमत कोणाचीच नाही. अठराव्या शतकात हिंदुस्थानचे राजकारण मराठ्यांच्याच इशार्यावर चालत होते, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळेच शैक्षणिक संस्थांनी इतिहासाची मोडतोड थांबवून सर्वसमावेशक मांडणी करणे ही काळाची गरज आहे.
मराठा साम्राज्याचा नकाशा वगळून विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक आकलनात मोठी पोकळी निर्माण करण्याचा हा प्रयत्न महाराष्ट्राची अस्मिता कदापि सहन करणार नाही. ज्यांनी तलवारीच्या जोरावर जगाचा नकाशा बदलला, त्यांना पुस्तकातील नकाशातून वगळण्याची ताकद कोणातही नाही. त्यामुळे आता संभाजीराजेंनी पुकारलेल्या या लढ्यावर आता दिल्लीचं तख्त काय उत्तर देत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
