इतिहासातून मराठा साम्राज्याचा विस्तार गायब? संभाजीराजेंची शिक्षण मंत्र्यांना पत्राद्वारे हस्तक्षेपाची मागणी

नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे राज्यभरात तसेच देशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 83

Sambhaji Raje writes to Education Minister seeking intervention : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) च्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठयपुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे राज्यभरात तसेच देशातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात इतिहासप्रेमी, शिवप्रेमी आणि विविध संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, छत्रपती घराण्याने देखील यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीराजे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सविस्तर पत्र लिहून मराठा साम्राज्याचा नकाशा पुन्हा पाठयपुस्तकात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले आहे की, कोणतेही ठोस कारण न देता नकाशा वगळणे हे मराठ्यांच्या उज्वल इतिहासाचा आणि राष्ट्ररक्षणासाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाचा अवमान आहे. मराठा साम्राज्याचे प्रभुत्व देशभर पसरले होते, याचे पुरावे इतिहासकारांनी दिलेले असून, हा इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, छत्रपती वृशालीराजे भोसले यांनी देखील या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. मराठा साम्राज्य हा केवळ इतिहासाचा भाग नसून आमच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा मुद्दा आहे. राजस्थानमधील विजयासारख्या ऐतिहासिक घटकांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्या नाकारणे हे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणत्याही दबावाखाली इतिहासात फेरफार होऊ नये, असा इशारा देखील त्यांनी दिला.

या निर्णयामागे नेमके कोणते कारण आहे, याबाबत NCERT कडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नसताना, कोणाच्या दबावामुळे हा नकाशा हटवण्यात आला का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता असून, मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.

follow us