तामिळनाडूच्या विरुधुनगर फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 23 ठार तर अनेक जण गंभीर जखमी, कर्नाटकात जत्रेतही अपघात

फटाके आणि स्फोटकांशी संबंधित निष्काळजीपणामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

Untitled Design 8

Untitled Design 8

Massive explosion in firecracker factory : तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये रविवारी घडलेल्या भीषण अपघातांनी पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. फटाके आणि स्फोटकांशी संबंधित निष्काळजीपणामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. तामिळनाडूतील वीरूधुंगर जिल्ह्याजवळील कट्टानारपट्टी या गावात रविवारी सकाळी एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की संपूर्ण परिसर हादरून गेला. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 23 कामगारांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटावेळी कारखान्यात सुमारे 30 कामगार उपस्थित होते.

प्रत्यक्षदर्शींच्या मते, स्फोटानंतर काही क्षणांतच आगीचे मोठे लोट उसळले आणि कारखान्याच्या इमारतीचा काही भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल आणि बचाव पथकांनी तातडीने मोहीम हाती घेतली. अनेक जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात निष्काळजीपणा किंवा सुरक्षा नियमांचे उल्लंघन हे कारण असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी या भागात फटाका उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचीही चर्चा आहे. प्रशासनाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, कर्नाटकातील दक्षिणा कन्नडा जिल्ह्यातील पुत्तुर येथेही अशीच एक धक्कादायक घटना घडली. श्री महालिंगेश्वरा मंदिर येथे सुरू असलेल्या जत्रेदरम्यान मंदिराच्या आवारात फटाके फोडले जात होते. यावेळी अचानक एक फटाका नियंत्रणाबाहेर जाऊन थेट प्रेक्षकांच्या दिशेने झेपावला. या अनपेक्षित घटनेत सात जण गंभीर भाजले गेले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले असून काहींवर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जत्रेतील वातावरणात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दोन्ही घटनांनी एकच प्रश्न पुन्हा समोर आणला आहे, फटाके आणि स्फोटकांच्या वापरात सुरक्षिततेचे नियम कितपत पाळले जात आहेत? सण-उत्सव आणि उद्योग या दोन्ही ठिकाणी सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम किती भीषण होऊ शकतात, याचे हे जिवंत उदाहरण आहे. संबंधित राज्य सरकारांनी या घटनांची गंभीर दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबियांना मदत आणि जखमींना योग्य उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अशा दुर्घटना टाळण्यासाठी केवळ आश्वासन नव्हे, तर कडक अंमलबजावणी आणि जबाबदारी निश्चित करणे अत्यावश्यक ठरणार आहे.

Exit mobile version