दिल्लीतल्या घडामोडींना वेग, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, आंदोलकांवरील कारवाई आणि पेपरफुटीच्या वाढत्या घटनांबाबत सविस्तर चर्चा झाली.

  • Written By: Published:
Untitled Design (69)

Sharad Pawar met Modi : दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सामाजिक माध्यमांवर या भेटीचे चार फोटो शेअर करत भेटीची माहिती दिली. संसदेत झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या पोस्टमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्याचे नमूद केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन, आंदोलकांवरील कारवाई आणि पेपरफुटीच्या वाढत्या घटनांबाबत सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आंदोलनाची सद्यस्थिती याबाबत शरद पवार यांनी पंतप्रधानांना माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. तसेच परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी आणि पेपरफुटी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

पंतप्रधानांनी शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये दोन्ही नेते गंभीर चर्चेत गुंतल्याचे दिसत आहे. एका छायाचित्रात सुप्रिया सुळेही उपस्थित असल्याचे पाहायला मिळते. शरद पवार यांच्या हातात एक फाईल असून त्यातील काही कागदपत्रे त्यांनी पंतप्रधानांना दिल्याचे छायाचित्रांमधून दिसते. ही कागदपत्रे जंतरमंतरवरील आंदोलनासंदर्भातील निवेदन असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान मोदी ते कागद वाचताना आणि त्यानंतर या विषयावर शरद पवार यांच्याशी चर्चा करताना दिसत आहेत. शेवटच्या छायाचित्रात मोदी आणि पवार एकत्र चालताना दिसत असून दोन्ही नेत्यांमधील संवादाचे ते प्रतीकात्मक चित्र मानले जात आहे.

‘व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही’; विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर तात्काळ सुनावणी घेण्यास SC चा नकार

दरम्यान, विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. सोमवारी आंदोलनकर्त्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमारानंतर वातावरण आणखी तापले होते. या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर जंतरमंतरवर विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी जाऊन आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही जंतरमंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या समजून घेतल्यानंतर आवश्यक ती मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला होता.

आजची पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट त्यामुळे अधिक महत्त्वाची मानली जात आहे. विद्यार्थी आंदोलन, पेपरफुटीचा प्रश्न आणि त्यावर केंद्र सरकारची भूमिका याबाबत या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवार लवकरच माध्यमांशी संवाद साधून या भेटीविषयी अधिक माहिती देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

follow us