भोपाळ : भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत मध्य प्रदेशमध्ये तब्बल 17 वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बदलला आहे. दुपारपर्यंत कुठेही चर्चेत नसलेले मोहन यादव (Mohan Yadav) मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री होणार आहेत. ते विद्यमान शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री होते. (Mohan Yadav will be the new Chief Minister of Madhya Pradesh.)
गत रविवारी (3 डिसेंबर) देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निवडणूक निकाल जाहीर झाले. यात तीन राज्यात भाजपने विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपने मध्य प्रदेश तर राखलेच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून काँग्रेसला सत्तेतून बेदखल केले. मध्य प्रदेशमध्ये भाजपने 230 पैकी 163 जागा जिंकत दोन तृतीयांश बहुमत प्राप्त केले. तर काँग्रेसला केवळ 66 जागा जिंकण्यात यश आले.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची निवड करण्यासाठी आज (11 डिसेंबर) मध्य प्रदेशात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. दुपारपर्यंत विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, नरेंद्र तोमर, प्रदेशाध्यक्ष वी. डी. शर्मा यांची नावे चर्चेत होते. मात्र या बैठकीत सर्व नवनिर्वाचित आमदारांनी चर्चेत नसलेल्या मोहन यादव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.
डॉ. मोहन यादव हे उज्जैन दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. 58 वर्षीय यादव हे आता देशातील काही निवडक उच्च शिक्षित मुख्यमंत्री म्हणून ते ओळखले जातील. यादव यांनी पीएचडी पूर्ण केली असून त्यांनी एमबीए आणि एलएलबीही पूर्ण केले आहे. डॉ. यादव यांनी मोठ्या संघर्षानंतर राजकारणात स्थान मिळवले. विद्यार्थी राजकारणातून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या यादव यांना मंत्रीपदापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल 41 वर्षे संघर्ष करावा लागला होता. पक्षात अनेक पदे भूषवल्यानंतर त्यांना सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली. आता मोहन यादव हे भाजपचे प्रस्थापित नेते म्हणून ओळखले जातात. उज्जैन विभागातील बड्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.