राजस्थानमधील उदयपूरमधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली. एका जन्मदात्या आईने आपल्या 14 वर्षांच्या मुलाचाच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज (रविवारी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुर्जन्य (वैष्णव) पारेख असं मृत मुलाचं नाव आहे. तर मनीषा पारेख असं आरोपी आईचं नाव आहे. आरोपी आई 5 वर्षांपासून मानसिकरित्या आजारी असल्याची माहिती आहे. दरम्यान, माहिती मिळताच आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (mother killing her 14-year-old son in udaypur rajsthan)
मृत पर्जुन्यचे वडील दीपक पारीख यांनी अंबामाता पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, ते आज सकाळी नेहमीप्रमाणे उठून मॉर्निग वॉकला गेले. त्यावेळी पत्नी मनीषा आणि मुलगा पुर्जन्याला घरी होते. परत आल्यानंतर घराचे दरवाजे आतून बंद होते. बराच वेळ दरवाजा वाजवूनही न उघडल्याने दीपक यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने बाल्कनीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी आरोपी आई आरामात बसली होती. तर पुढे थोड्या अंतरावरच मुलाचा मृतदेह बेडवर पडला होता, त्याच्या मानेवरही अनेक खुणा होत्या. बेडजवळ दोरीचे दोन तुकडेही पडले होते.
घटनेची माहिती मिळताच अंबामाता पोलिस स्टेशनचे अधिकारी हणवंत सिंह राजपुरोहित यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा सुरु केला. तसंच आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. हणवंत सिंह यांनी सांगितले की, मानसिक त्रासामुळे या महिलेवर 2018 पासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मृतांचे नातेवाईक सध्या काहीही बोलण्याचे टाळत आहेत. पण महिलेची चौकशी केली जात आहे. सुरुवातीला महिलेने हत्येची कबुली दिली आहे. मात्र गरज भासल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणार आहोत.
दरम्यान, मयत पुर्जन्यचा ३ दिवसांपूर्वी वाढदिवस झाला होता. यावेळी घरी मोठे सेलिब्रेशन झाले होते. त्यात आईनेही उत्साहाने सहभाग घेतला होता. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीपर्यंतही सर्व काही ठिक होते. मात्र आज सकाळी अचानक असं नेमकं काय घडलं त्याचा पोलीस तपास घेत आहेत.