”देशात येणाऱ्या काळात केवळ भाजपच उरेल आणि सर्व प्रादेशिक पक्ष संपतील,” हे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे काही वर्षांपूर्वीचे विधान सध्या भारतीय राजकारणात तंतोतंत खरे ठरताना दिसत आहे. गेल्या दशकभरात भाजपने मित्रपक्षांच्या मदतीने स्वतःचा पाया विस्तारला खरा, पण ज्यांच्या खांद्यावर हात ठेवून भाजपने सत्ता मिळवली, तेच मित्रपक्ष आज एकतर अस्तित्वाच्या लढाईत आहेत किंवा इतिहासाच्या पानात जमा होण्याच्या मार्गावर आहेत. नुकत्याच समोर आलेल्या पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींनी या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे. नेमकं आतापर्यंत भाजपने किती मित्र पक्षांचे अस्तित्त्व मोडीत काढल त्याचाच घेतलेला हा आढावा…
ममता बॅनर्जी यांनी खरचं CM पदाचा राजीनामा दिला नाही तर, पुढे काय? नियम काय सांगतात?
ममतांची जुनी ‘दोस्ती’ आणि आजची परिस्थिती : सुरूवात नुकत्याच लागलेल्या बंगालच्या निकालांपासून करूया. कारण आज भाजपच्या कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जी एकेकाळी भाजपच्या महत्त्वाच्या सहकारी होत्या. 11998 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील NDA पाठिंबा दिला होता. एवढेच काय तर, वाजपेयी सरकारमध्ये त्या रेल्वेमंत्रीही होत्या. मात्र, भाजपने बंगालमध्ये स्वतःची पाळेमुळे इतकी घट्ट रोवली की, आज त्याच ममता बॅनर्जींना भाजपच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. ज्या तृणमूलच्या जोरावर भाजपने बंगालमध्ये शिरकाव केला, आज तोच पक्ष भाजपच्या विस्तारवादी धोरणामुळे बॅकफूटवर गेल्याचे विश्लेषण केले जात आहे.
महाराष्ट्रातील ‘मराठी अस्मिते’चे दोन तुकडे : यानंतर सर्वाधिक चर्चा झालेल्या महाराष्ट्रातील पक्षांतराची म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेच्या फुटीवर नजर टाकूया. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांची 25 वर्षांहून अधिक काळ जुनी युती होती. मात्र, 2019 च्या निवडणुकीनंतर ही युती तुटली आणि 2022 मध्ये शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. भाजपने एकनाथ शिंदे गटाला साथ देऊन केवळ सत्ताच मिळवली नाही, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मूळ पक्षाला सत्तेबाहेर ढकलले. हीच रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही दिसून आली, जिथे अजित पवारांना सोबत घेऊन शरद पवारांच्या पक्षाला खिंडार पाडण्यात आले. (BJP Politics)
बिहार : जेडीयू आणि लोक जनशक्ती पार्टीची पीछेहाट : नितीश कुमार यांच्या जेडीयूने भाजपसोबत अनेकदा सरकार चालवले, पण भाजपने त्यांचा राजकीय पाया कमकुवत केल्याचा आरोप वारंवार झाला. यामुळे जेडीयूचा बिहारमधील जनाधार मोठ्या प्रमाणावर घटला आहे. रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर भाजपने चिराग पासवान यांना छुपा पाठिंबा देऊन जेडीयूचे नुकसान केल्याचा आरोप झाला, पण शेवटी एलजेपीमध्येच फूट पडून पक्ष दोन भागात विभागला गेला. भाजपने बिहारमध्ये स्वतःची ताकद इतकी वाढवली आहे की, नितीश कुमारांना आता वारंवार पलटी मारूनही स्वतःचे वर्चस्व टिकवणे कठीण जात आहे.
पंजाब आणि हरियाणा: मित्रपक्षांचा ‘सफाया’ : शिरोमणी अकाली दल भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष मानल्या जाणाऱ्या अकाली दलाने 2020 मध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात युती तोडली. तेव्हापासून पंजाबमध्ये या पक्षाची ताकद प्रचंड घटली असून तो राजकीय अस्तित्वासाठी झगडत आहे. एवढेच नव्हे तर, हरियाणात भाजपने जेजेपीसोबतची युती तोडल्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत या पक्षाचा पूर्णपणे सफाया झाला आहे. युतीतून बाहेर पडताच हा पक्ष शून्यावर आला आहे.
जम्मू-काश्मीर – पीडीपी (PDP) : 2015 मध्ये मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपीसोबत भाजपने ‘विपरीत’ युती केली. 2018 मध्ये भाजपने पाठिंबा काढताच राज्याची समीकरणे बदलली आणि आज पीडीपी राजकीयदृष्ट्या अत्यंत कमकुवत झाली आहे.
ईशान्य भारत आणि गोव्यातील चित्र : ईशान्य भारतात ‘नेडा’ (NEDA) आघाडीच्या माध्यमातून भाजपने आसाम गण परिषद (AGP) सारख्या आक्रमक पक्षांना दुय्यम भूमिका घेण्यास भाग पाडले आहे. गोव्यातही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) आणि गोवा फॉरवर्डच्या आमदारांना फोडून भाजपने स्वतःची सत्ता भक्कम केली आणि स्थानिक पक्षांना प्रभावहीन केले. त्रिपुरा आणि मणिपूरमध्येही भाजपने स्थानिक पक्षांना बाजूला सारून स्वतःची पूर्ण सत्ता प्रस्थापित केली आहे.
एआयएडीएमके (AIADMK) : जयललितांच्या निधनानंतर एआयएडीएमके भाजपच्या जवळ आली. मात्र, भाजपसोबतच्या युतीमुळे द्राविडी राजकारणात या पक्षाची पकड सैल झाली आणि अंतर्गत फुटीमुळे हा पक्ष सध्या संघर्षाच्या काळातून जात आहे.
1998 ची ‘ती’ एक जागा आज 207 वर; 29 वर्षांपूर्वीच ममतांनी स्वतःच रचली होती राजकीय अंताची स्क्रिप्ट
भाजपची ‘सायलेंट’ रणनीती कशी काम करते?
भाजपच्या या झंझावाताने एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे की, या पक्षात ‘मैत्री’पेक्षा ‘विस्तार’ अधिक महत्त्वाचा मानला जातो. काश्मीरच्या खोऱ्यातून मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपीला खिळखिळे करण्यापासून ते कन्याकुमारीच्या किनारपट्टीवर एआयएडीएमकेचा प्रभाव कमी करण्यापर्यंत, भाजपची ‘सायलेंट रणनीती’ यशस्वी ठरली आहे.
आजघडीला एनडीएमध्ये असलेले चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्यासारखे नेते भाजपसोबत सत्तेत असले, तरी त्यांच्या मनात “पुढचा नंबर आपला तर नाही ना?” ही धाकधूक कायम आहे. भाजपने कोणत्याही पक्षाला थेट ‘संपवले’ नाही, पण त्यांच्या कार्यपद्धतीने प्रादेशिक पक्षांच्या पायाखालची जमीन नक्कीच सरकवली आहे.
एकीकडे भाजप ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा देत असताना, दुसरीकडे प्रादेशिक पक्षांचे एकामागून एक ढासळणारे बुरूज भारतीय राजकारणात ‘एक देश, एक पक्ष’ या दिशेने वाटचाल तर होत नाही ना? असा गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत. आगामी काळात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी या प्रादेशिक पक्षांना भाजपच्या ‘विस्तारवादा’ला तोडीस तोड उत्तर शोधावे लागेल, अन्यथा जे.पी. नड्डा यांचे “केवळ भाजपच उरेल” हे विधान वास्तवात उतरायला वेळ लागणार नाही.
