अण्णामलाईंना दूर करणं भोवलं! तामिळनाडूत भाजपचा उलटा प्रवास

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एडीएमकेसोबत असताना चार जागांवर विजय मिळाला होता.

News Photo   2026 05 05T161420.342

पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Election) भाजपने एक राज्य वगळता सर्वत्रच जोरदार मुसंडी मारली. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळवत भाजपने तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांपासूनची सत्ता उद्धवस्त केली. आसाममध्येही पक्षाने हॅट्रीक करत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवलं. पुदुच्चेरीमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार आले.

भाजपने चारही राज्यांमधील हा विजय जल्लोषात साजरा केला. पण तमिळनाडू हे राज्य अपवाद ठरलं. सर्वच बाबतीत भाजपची कामगिरी फ्लॉप शो ठरली आहे. राज्यात भाजपला केवळ एका जागा मिळाली आहे. मागील निवडणुकीत भाजपला चार जागा मिळाल्या होत्या.अर्थात सुपरस्टार विजय यांच्यासमोर केवळ भाजपच नव्हे तर डीएमके आणि एडीएमके हे मातब्बर पक्षही टिकू शकले नाहीत. पण त्यानंतरही भाजपची झालेली पीछेहाट पक्षासाठी मोठा धक्का आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनाच मतदारांनी घरे बसविले ! व्ही. एस. बाबू यांना विजय; कसा पावला ?

राज्यात भाजपला सध्या कोणताही लोकप्रिय राजकीय चेहरा नाही. माजी आयपीएस अधिकारी अण्णामलाई यांनी २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ते २०२१ ते २०२५ असे चार वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. या काळात त्यांनी राज्यभर भाजपची ताकद वाढवण्याचा जोरदार प्रयत्न केला. एडीएमकेसोबत न जाता एकला चलोची भूमिका घेण्यास त्यांनीच नेतृत्वाला भाग पाडलं होतं. पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही.

२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एडीएमकेसोबत असताना चार जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी २.६ टक्के मतं मिळाली होती. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एडीएमकेची साथ सोडल्यानंतर ही टक्केवारी ११ टक्क्यांच्या पुढे गेली होती. भाजपला पहिल्यांदाच मतांच्या टक्केवारीचा दुहेरी आकडा गाठता आला होता. मात्र, तमिळनाडूमध्ये पुन्हा आपली ताकद वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एडीएमकेसोबत जाण्याची रणनीती आखली.

अण्णामलाई यांचा एडीएमकेसोबत जाण्यास विरोध असल्याने त्यांना निवडणुकी लागण्यापूर्वी प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतरच आघाडीची घोषणा करण्यात आली. एवढंच नाही तर त्यांना उमेदवारीही देण्यात आली नाही. प्रचारातही अण्णामलाई यांच्यासारख्या नेतृत्वाला फारसं महत्व दिलं गेलं नाही. जे मुद्दे विजय मांडत होते, त्याच मुद्द्यांवर अण्णामलाई यांनीही डीएमके सरकारला घेरलं होतं. त्यामुळे राज्यात त्यांची लोकप्रियता चांगली वाढली होती.

या सगळ्या वातावरणात कणखर नेता म्हणून त्यांची ओळख झाली होती. पण यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांनाच डावललं, परिणामी भाजपची चार जागांवरून एका जागेपर्यंत घसरण झाली. मतांची टक्केवारी किंचित वाढली असली तरी ती तीन टक्क्यांच्या खालीच राहिली. अण्णमलाई यांना पदावरून हटविल्यानंतरही भाजपच्या पदरी निराशाच पडली आहे. तमिळनाडूमध्ये आपले अस्तित्व पुन्हा दाखविण्यासाठी भाजपला आता नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. एडीएमकेला सोबत घेत अण्णामलाई यांना डावलणे पक्षाला भोवले आहे.

follow us