Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी नेते मंडळीत पक्ष बदलण्याची स्पर्धाच सुरू होती. अनेक दिग्गज नेत्यांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्ष बदल केला. सहाजिकच पक्ष सोडताना आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना त्यांच्या डोक्यात उमेदवारीचा विचार होता. यातील अनेक जणांची ही इच्छा पूर्णही झाली तर काही जणांची मात्र निराशा झाली. भाजपाचा विचार केला तर मागील दहा वर्षांच्या काळात अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. आता यातील बऱ्याच नेत्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने तिकीट दिले आहे. उत्तर प्रदेशात 23, हरयाणामध्ये सहा आणि पंजाबमधील सात भाजप उमेदवार याआधी दुसऱ्या पक्षात होते.
भाजपात दुसऱ्या पक्षातील अनेक नेत्यांनी प्रवेश केला आहे. मागील दहा वर्षात पक्षात आलेल्या नेत्यांपैकी 106 नेत्यांना भाजपने यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या 23 उमेदवारांनी मागील दहा वर्षांच्या काळात पक्षात प्रवेश केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत हरियाणातील सर्व दहा जागांवर भाजपने विजय मिळवला होता. आताही पक्षाने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. यातील सहा उमेदवार दलबदलू आहेत. ते आधी दुसऱ्या पक्षात होते. भिवानी मतदारसंघातून धर्मवीर सिंह, रोहतकमधून डॉ. अरविंद शर्मा, हिसारमधून रणजीत चौटाला, सिरसामधून अशोक तंवर, गुडगावमधून राव इंद्रजित सिंह आणि कुरुक्षेत्रमधून नवीन जिंदाल यांना तिकीट दिले आहे. हे सर्व आधी काँग्रेस पक्षात होते आता भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
लोकसभेत बहुमत मिळालं नाही तर प्लॅन B काय?, अमित शाहांनी सगळं फोडूनच सांगितलं
आंध्र प्रदेशातील सर्व 25 मतदारसंघात 13 मे रोजी मतदान झाले आहे. राज्यात भाजप, टीडीपी आणि जनसेना एकत्र आहेत. येथे भाजपने सहा उमेदवार दिले आहेत. यातील पाच तर दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. तेलंगणामध्येही भाजपचे 11 उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत. तेलंगणातही चौथ्या टप्प्यात मतदान झाले आहे. या राज्यात दलबदलू उमेदवारांवरच भाजपाची भिस्त आहे.
पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचे सात उमेदवार आधी दुसऱ्या पक्षात होते. पण यंदा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पंजाबमध्ये शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे. तसेच झारखंडमध्ये सात, ओडिशात सहा, तामिळनाडूत पाच, महाराष्ट्रात सात, पश्चिम बंगालमध्ये दहा, बिहारमध्ये तीन, कर्नाटकात चार, केरळमध्ये दोन, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी दोन आणि अन्य राज्यांतील चार उमेदवारांनी मागील दहा वर्षात भाजपात प्रवेश केला आहे.
मध्य प्रदेशातील दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया आधी काँग्रेसमध्ये होते. आता ते भाजपात आहेत आणि यंदा गुना मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या पत्नी परनीत कौर यांनी याआधी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकली होती. आता भाजपने त्यांना तिकीट दिले आहे. पीलिभित मतदारसंघातील भाजप उमेदवार जितीन प्रसाद याआधी काँग्रेसमध्ये होते.
पृथ्वीराज चव्हाणांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यासाठी बसावं, अजित पवार गटाचा टोला
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन आता भाजपच्या तिकिटावर दुमका मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. रवनित सिंह बिट्टू लुधियाना मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढत आहेत. आम आदमी पार्टीचे एकमेव खासदार सुशील कुमार रिंकू यांनी निवडणुकीच्या दरम्यान भाजपात प्रवेश केला.