Narayan Rane : राज्यसभेचं कामकाज सुरू आहे. खासदार मंत्र्यांना प्रश्न विचारतात त्याची नेमकी उत्तरं मंत्री देतात. पण, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबतीत राज्यसभेत (Rajya Sabha) वेगळाच किस्सा घडला. खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दुसरंच उत्तर दिलं. आता त्यांना प्रश्न समजला नाही की त्यांनी खरंच वेगळं उत्तर दिलं याचं लॉजिक समोर आलं नाही. मात्र, विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यानंतर सभापती हरिवंश नारायण सिंह यांनी हस्तक्षेप करत मंत्री राणे यांंना खासदार कार्तिकेय शर्मा यांचा प्रश्न समजावून सांगितला.
नारायण राणे लोकसभेच्या रिंगणात? शिंदे गटाच्या मंत्र्यांनी सांगितला PM मोदींचा प्लॅन ?
खासदार कार्तिकेय शर्मा यांनी देशातील कामगारांच्या कल्याणासाठी सरकारकडून काय पावलं उचलली जात आहेत? असा प्रश्न मंत्री नारायण राणे यांना विचारला. यावर उत्तर देताना नारायण राणे यांनी मात्र एमएसएमईत निर्यात कसं वाढवणार याचा खुलासा केला. अनेक उपाययोजना करून इंडस्ट्री पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. निर्यातीत एमएसएमई क्षेत्राची हिस्सेदारी वाढविण्यासाठी, स्पर्धा वाढविण्यासाठी सरकारने मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत व्यवसायाची सुगमता आणि संवर्धन तसेच निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत विविध निर्णय घेतले आहेत, असे सांगितले.
नारायण राणे उत्तर देताना गडबडले आहेत याचा अंदाज येताच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी सभापतींनी हस्तक्षेप करत खासदारांनी नेमका काय प्रश्न विचारला होता याची माहिती नारायण राणेंना दिली. यावर राणे म्हणाले, मी जे काही आता सांगत आहे त्याद्वारे इंडस्ट्री सुरू होऊन कामगारांचा फायदाच होणार आहे. कारखानेच जर बंद राहिले तर कामगारांचं कल्याण कसं होणार? असा सवाल केला. यानंतर सभापतींनी कामगारांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत याची माहिती संबंधित खासदारांना बोलावून द्या, अशा सूचना मंत्री राणे यांना दिल्या.