आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवणार; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची घोषणा
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार असल्याची शशिकांत शिंदे यांची माहिती.
Both nationalists will contest the elections : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट आणि अजित पवार गट) महत्त्वाचा राजकीय निर्णय झाला आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना मोठा फटका बसल्यानंतर, भविष्यातील निवडणुकांमध्ये दोन्ही गट एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. या चर्चेनुसार, राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्तपणे लढवतील. मात्र ज्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडे तुल्यबळ आणि प्रभावी उमेदवार असतील, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
कोणत्या 7 कारणांमुळे भाजपने शिवसेना उबाठा-मनसेला दिली मात; ज्याचा ठाकरे बंधूंनी विचारही केला नसेल
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीतील निकालांबाबत बोलताना शिंदे यांनी जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारतो, असे नमूद केले. या निकालांतून पक्षाला आत्मपरीक्षणाची संधी मिळाल्याचे सांगत, पुढील निवडणुकांसाठी अधिक संघटित आणि समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती आधीच निश्चित झाली असती आणि उमेदवारीचा घोळ शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिला नसता, तर निवडणुकीचे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. वेळेत युती आणि स्पष्ट रणनीती ठरली असती तर पक्षाला अधिक चांगले यश मिळाले असते, असा सूचक इशाराही जयंत पाटील यांनी दिला.
एकूणच, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांवर होणार असून, विरोधकांसाठीही ही युती मोठे आव्हान ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
