सोसायटीचा निर्धार आणि सरकारची साथ, वाकडमध्ये 120 किलोवॅटचा सौरऊर्जा प्रकल्प, महिन्याला होणार 2.30 लाखांची बचत

Rahul Kalate : सरकारी काम आणि सहा महिने थांब हा अनुभव अनेकदा येतो मात्र वाकड मधील प्रिस्टीन प्रोलाइफ फेज 3 सोसायटीचा अनुभव काहीसा वेगळा आहे.

Rahul Kalate

Rahul Kalate : सरकारी काम आणि सहा महिने थांब हा अनुभव अनेकदा येतो मात्र वाकड मधील प्रिस्टीन प्रोलाइफ फेज 3 सोसायटीचा अनुभव काहीसा वेगळा आहे. महावितरणच्या सर्व परवानग्या आणि प्रक्रिया पूर्ण होऊन अवघ्या चार महिन्यात सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटनही झाले. यासाठी सोसायटीला २१.६७ लाख रुपयांचे सरकारी अनुदान मिळाले. वाकडमधील प्रिस्टीन प्रोलाईफ फेज ३ सोसायटीत (Pristine Prolife Phase 3, Wakad) नुकताच १२० किलोवॅट क्षमतेचा रूफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला. दिनांक १ मार्च २०२६ रोजी प्रकल्पाचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

सुमारे ७६ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी शासनाकडून २१.६७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. तर सोसायटी सभासदांनी प्रत्येकी ७००० अशी वर्गणी जमा करून उर्वरित योगदान दिले. यातून सोसायटीचे दर महिन्याला सुमारे २ लाख ३० हजार इतके वीज बिलाची बचत होणार असून सोसायटीवरील आर्थिक भार कमी होणार आहे. परिणामी हा उपक्रम किफायतशीर व दीर्घकालीन बचत करणारा ठरेल. प्रिस्टीन प्रोलाइफ फेज 3 सोसायटीचा हा उपक्रम शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण व अनुकरणीय पाऊल ठरेल, असे म्हणत राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी सोसायटीच्या सदस्यांचे कौतुक केले. हरित ऊर्जा हेच भविष्यातील ऊर्जा स्त्रोत असून नागरी विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

सौर प्रकल्पामुळे सोसायटीच्या वीज खर्चात लक्षणीय बचत होणार असून पर्यावरणपूरक व शाश्वत ऊर्जेच्या वापराला मोठी चालना मिळणार आहे. असे मत सोसायटीचे सचिव स्वरूप पाटील यांनी व्यक्त केले. सुरुवातीला सर्व सदनिका धारकांना विश्वासात घेऊन त्यांना संपूर्ण उपक्रमाचा फायदा समजावून सांगितला. त्यामुळे सर्वांनी वर्गणी देऊन या प्रकल्पाला गती दिली. असे सोसायटी अध्यक्ष अल्पेष म्हणाले.

कार्यक्रमास नगरसेवक राहुल कलाटे, सोसायटीचे अध्यक्ष अल्केश चरपे, सचिव स्वरूप पाटील, खजिनदार अरविंद, अनुराग शिरोडे, भीवाजी सूर्यवंशी, श्रीधर घरपुरे, प्रशांत गोरे, अनुराग तिवारी तसेच इतर सोसायटी सदस्य व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोसायटी समितीचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि रहिवाशांच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्णत्वास गेला आहे.

हा प्रकल्प संपूर्ण शहरात ‘रोल मॉडेल‘ ठरेल – राहुल कलाटे

प्रिस्टीन प्रोलाइफ फेज ३ सोसायटीतील सदस्यांनी राबवलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असून लोकसहभाग, सरकारी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि गतिमानता, या सगळ्यांच्या संयुक्त परिणामातून हा प्रकल्प अवघ्या चार महिन्यात आकाराला आलाय. सरकारची मदत आणि कालमर्यादा यासाठी हा प्रकल्प संपूर्ण शहरात ‘रोल मॉडेल‘ ठरेल. असे प्रकल्प इतर सोसायटीत राबवले गेले पाहिजेत.

follow us