Supriya Sule criticized Modi Government : मणिपूरवरून संसदेत केंद्र सरकार आणि विरोधकांत संघर्ष सुरूच आहे. याच मुद्द्यावर आजपासून (दि.8) लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकावर घणाघाती टीका केली. महागाई, बेरोजगारी, वंदे भारत रेल्वे आणि मणिपूर हिंसाचारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.
मणिपुरात अजूनही हिंसाचार सुरू आहे. येथे महिलांची धिंड काढली जाते, हे कसं सहन करायचं? केंद्र सरकारला काहीच वाटत नाही का? मणिपूरमधील मुली भारताच्या मुली नाहीत का? असे सवाल सुळे यांनी सरकारला विचारले.
Video : लोकसभेत डोवाल अन् शाह काँग्रेसकडून टार्गेट; PM मोदींच्या चुप्पीची सांगितली कारणे
मागील नऊ वर्षात नऊ सरकारं पाडली. भाजपाच्या काळात महागाई वाढली. महागाई रोखण्यात मोदी सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. मोदी सरकारच्या काळात दूध महाग झाले. जगातील अनेक याद्यांत भारताची घसरण झाली. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारचं मोठं अपयश आहे, अशी टीका सुळे यांनी केली. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी वंदे भारत रेल्वेच्या कारभारावरही सुळे यांनी जोरदार टीका केली. वंदे भारत ट्रेन गरीबांसाठी नाही. मी वंदे भारतच्या विरोधात नाही पण जे सत्य आहे ते नाकारता येणार नाही. माझ्या मतदासंघात एकाही रेल्वे स्टेशनवर वंदे भारत ट्रेन थांबत नाही. वंदे भारत रेल्वे फक्त पाहता येते या रेल्वेने प्रवास करणे मात्र अशक्यच आहे, अशी खंत सुळेंनी व्यक्त केली.
सध्या भाजपकडून तत्वहीन राजकारण सुरू आहे. पार्टी विथ डिफरन्स कुठं गेलं, देशात युपीए सरकार असताना मुलभूत गोष्टींच्या किंमतीवर नियंत्रण होतं. मात्र आज महागाई गगनाला भिडली आहे. मोदी सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे पण, ते खोटं आहे. कोणत्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं, ते सरकारने स्पष्ट करावे. कांदा दूध याबाबत सरकार जागरूक नाही. कांद्याची निर्यात केली जात नाही.