Download App

दु्र्दैवचं! एक घोषणा अन् होत्याचं नव्हतं, चोरट्यांनीही केला हात साफ; वाचा चेंगराचेंगरीची एक-एक घटना…

प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांबाबत ऐनवेळी एक घोषणा झाली. यानंतर लोकांची पळापळ सुरू झाली. यातच धक्काबुक्की झाली.

New Delhi Railway Station Stampede : प्रयागराज येथे महाकुंभाचा सोहळा सुरू आहे. या कुंभमेळ्याला (New Delhi Railway Station Stampede) जाण्यासाठी दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली होती. खरंतर ही गर्दी शनिवारी सायंकाळपासूनच सुरू झाली होती. रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने गर्दी वाढली होती. या गोष्टीची जाणीव असतानाही रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांबाबत ऐनवेळी एक घोषणा झाली. यानंतर लोकांची पळापळ सुरू झाली. यातच धक्काबुक्की, रेटारेटी अन् चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 18 लोकांचा मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे, याही परिस्थितीत चोरट्यांनी चाकू ब्लेड चालवून प्रवाशांच्या दागिने आणि पैशांवर हात साफ केला. या घटनेची डिटेल माहिती घेऊ या..

दर तासाला दीड हजार तिकीट विक्री अन् एन्ट्री पॉइंट बेवारस.. चेंगराचेंगरीचं कारण सापडलं

एक घोषणा अन् चेंगराचेंगरीला सुरुवात

प्रयागराजच्या महाकुंभात जाण्यासाठी शनिवारी सायंकाळापासून रेल्वे स्टेशनवर गर्दीस सुरुवात.

गर्दी वाढत असतानाही नियोजनाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

रात्री आठ वाजेपर्यंत स्टेशनवर तोबा गर्दी झाली होती.

याच दरम्यान रेल्वे रद्द झाल्याने गोंधळ होऊन गर्दीत वाढ

प्रयागराजसाठी जाणाऱ्या स्वतंत्रता सेनानी आणि भुवनेश्वर राजधानी या रेल्वेला उशीर झाल्याने आणखी गर्दी वाढली.

या रेल्वे 12 आणि 14 प्लॅटफॉर्मवर येणार होत्या.

ऐनवेळी 16 प्लॅटफॉर्मवरुन स्पेशल ट्रेन जाण्याची घोषणा झाली.

या घोषणेमुळे लोक सैरावैरा पळू लागले. धक्काबुक्की अन् चेंगराचेंगरीला सुरुवात झाली.

रेल्वे डीसीपींचं म्हणणं काय

रेल्वे डीसीपी केपीएस मल्होत्रा यांनी सांगितले की प्रवासी प्लॅटफॉर्म नंबर 14 वर जमा झाले होते. या ठिकाणी प्रयागराज एक्सप्रेस उभी होती. स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी या गाड्यांना उशीर झाल्याने प्लॅटफॉर्म 12, 13 आणि 14 वर गर्दी वाढत गेली. यातच 14 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरील एस्केलेटर जवळ स्थिती हाताबाहेर गेली. या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून भरपूर प्रयत्न करण्यात आले.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट; चेंगराचेंगरीतील मृतांना १० लाख, जखमींना अडीच लाखांची मदत जाहीर

चोरट्यांनी चाकू फिरवले

या चेंगराचेंगरी दरम्यान चोरट्यांनी देखील हात साफ करून घेतला. चोरांनी लोकांचे खिसे कापण्यासाठी गर्दीत चाकू आणि ब्लेड फिरवले. यात अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांना रक्तस्त्राव झाला. ज्यामुळे चेंगराचेंगरीची तीव्रता अधिक वाढली. चोरट्यांनी तर मृतदेहांच्या अंगावरील दागिनेही काढून घेतले. खिसे कापून पैसेही काढून घेतले गेले. पाकिटमारांच्या या कृत्यावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

मृतांना 10 लाख, जखमींना अडीच लाखांची मदत

सरकारने अपघातात (stampede) मृत्यू झालेल्या आणि जखमींना भरपाई जाहीर केलीय. त्यानुसार, मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जखमींना पुढील उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

follow us