विदेश दौऱ्यांवर नवीन टॅक्स लावणार असल्याची सोशल मीडियावर अफवा; पीएम मोदींनी स्वतः दिलं स्पष्टीकरण

विदेश प्रवासावर कोणताही नवीन कर किंवा अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

Untitled Design 32 1

Untitled Design 32 1

New tax on foreign trips : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विदेश प्रवासावर सरकार अतिरिक्त कर किंवा विशेष सेस लावणार असल्याच्या चर्चांनी मोठा जोर धरला होता. त्यामुळे व्यवसाय, शिक्षण, नोकरी किंवा पर्यटनासाठी परदेशात जाण्याची तयारी करणाऱ्या नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. विशेषतः विद्यार्थ्यांचे पालक, व्यावसायिक आणि वारंवार विदेश दौरे करणाऱ्या प्रवाशांमध्ये या चर्चेमुळे मोठी अस्वस्थता होती. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढे येत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. परदेह्स प्रवासावर कोणताही नवीन कर किंवा अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याची सरकारची कोणतीही योजना नसल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत काही पोस्ट, व्हिडिओ आणि कथित अहवाल मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत होते. त्यामध्ये मध्य पूर्वेतील वाढत तणाव, आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम लक्षात घेता केंद्र सरकार विदेश प्रवासावर अतिरिक्त कर लावण्याचा विचार करत असल्याचा दावा करण्यात आला होता. काही पोस्टमध्ये तर सरकारच्या उच्चस्तरीय बैठकांमध्ये यावर चर्चा झाल्याचा देखील उल्लेख करण्यात आला होता.

या चर्चांमुळे विशेषतः विदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अनेक कुटुंबांनी शिक्षणासाठी मोहा प्रमाणात आर्थिक नियोजन केलेलं असताना अतिरित्त कर लागू झाल्यास त्याचा थेट परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्याचबरोबर पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक, ट्रॅव्हल एजन्सी आणि नियमित विदेश दौरे करणाऱ्या उद्योग क्षेत्रातील व्यक्तींमध्ये देखील या चर्चांमुळे अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झालं होतं.

दरम्यान, या अफवांनी वेग घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत परिस्थिती स्पष्ट केली. ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. यामध्ये तथ्याचा कणभर देखील अंश नाही. विदेश प्रवासावर अशा प्रकारचे निर्बंध किंवा अतिरिक्त कर लावण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असं पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे.

ब्रेकिंग : मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा मैदानात; 30 मे पासून आंतरवालीत आमरण उपोषण

पंतप्रधानांनी पुढे सांगितलं की, त्यांचं सरकार नागरिकांसाठी ईज ऑफ लिविंग म्हणजेच जीवन अधिक सुलभ करण्यासाठी आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक ओझं टाकणारे निर्णय घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

विशेष म्हणजे, याआधी पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत करण्याचं आणि अनावश्यक खर्च टाळण्याचा आवाहन केलं होतं. मात्र काही सोशल मीडिया युजर्सनी आणि काही अप्रमाणित अहवालांनी त्याचा चुकीचा संदर्भ जोडत विदेश प्रवासावरील कराची चर्चा सुरू केली होती. त्यानंतर ही माहिती वेगाने व्हायरल झाली आणि अनेकांनी ती खरी असल्याचं मानायला सुरूवात केली.

पंतप्रधानांच्या या स्पष्टीकरणानंतर आता विदेश प्रवासाची योजना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः उन्हाळी सुट्यांमध्ये विदेशात पर्यटनासाठी जाणाऱ्या कुटुंबांनी आणि विदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केलं आहे. सरकारकडून कोणताही नवीन कर लागू होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चाना देखील आता पूर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, तज्ज्ञांनी देखील सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत सरकारी स्त्रोतांची पडताळणी करण्याचं आवाहन केलं आहे. कारण अशा अफवांमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. आता पंतप्रधानांनी स्वतः भूमिका स्पष्ट केल्यामुळे या विषयावरील संभ्रम दूर झाला आहे.

Exit mobile version