Who Will Be The New Bihar CM : नितीश कुमार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीनंतर, बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री असेल अशी अटकळ बांधली जात आहे. भाजपच्या आघाडीच्या दावेदारांमध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, मंत्री दिलीप जयस्वाल, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय आणि पाच वेळा आमदार राहिलेले संजीव चौरसिया यांचा समावेश आहे. इतर अनेक नावे देखील वर्तवली जात आहेत, परंतु त्यांची नावे उघड झालेली नाहीत.
मुख्यमंत्रीपदाचे दावेदारांमध्ये कोण-कोण?
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारची कमान सांभाळणाऱ्यांमध्ये पहिलं नाव चर्चेत आहे ते म्हणजे सम्राट चौधरी. नितीश कुमार यांच्यानंतर CM पदासाठी चौधरी यांचा दावा मजबूत मानला जातोय. कारण, एनडीमध्ये 89 आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. शिवाय नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये चौधरी यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह अर्थ, आरोग्य, नगरविकास आणि गृहखाते अशी महत्त्वाची खाती आहेत. शिवाय ते भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते देखील आहेत आणि संघटनेत त्यांची मजबूत पकडदेखील आहे.
राजकीय वारसा असलेल्या चौधरी यांचे वडील शकुनी चौधरी हे सात वेळा आमदार आणि खासदार होते. त्यांनी १९९९ मध्ये राजदमधून राजकारणात प्रवेश केला आणि राबडी देवी सरकारमध्ये कृषी मंत्री झाले. नंतर ते जेडीयू आणि नंतर भाजपमध्ये सामील झाले. २०२३ मध्ये ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केले.
विजय सिन्हा
चौधरी यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या उमेदवारांमध्ये दुसरं नाव आहे ते विजय सिन्हा यांचे. विजय सिन्हा हे त्यांच्या आक्रम शैलीसाठी परिचित असून, त्यांनी वेळोवेळी तेजस्वी यादव यांच्या विरोधात आवाज उठवला आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची आणि माफियांवर कारवाई करण्यासाठी देखील ते ओळखले जातात. सिन्हा २००५ पासून लखीसरायचे आमदार असून, सिव्हिल इंजिनिअर असलेले सिन्हा आरएसएस-अभाविप पार्श्वभूमीचे आहेत. त्यांनी २०२० ते २०२२ पर्यंत विधानसभा अध्यक्ष आणि नंतर विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले आहे.
निशांत कुमार
वरील दोन नावांनंतर मुख्यमंत्रीपदासाठी नव्हे पण उपमुख्यमंत्री पदासाठी प्रबळ शक्यता असलेल्यांमध्ये खुद्द नितीश कुमार यांच्या मुलगा म्हणजेच निशांत कुमार यांचा नंबर लागतोय. मात्र, निशांत कुमार नवख असल्याने आणि राजकारणाचा दाणगा अनुभव नसल्याने त्यांना किती जणांचा पाठिंबा मिळतो हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत चार ओबीसी भाजपचे चेहरे
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या भाजपच्या चार नेत्यांमध्ये एक गोष्ट समान आहे: ती चौघेही ओबीसी आहेत. सम्राट चौधरी हे ओबीसी कोएरी कुशवाह जातीचे आहेत, तर दिलीप जयस्वाल हे ओबीसी कलवार जातीचे आहेत. शिवाय, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय हे यादव समुदायाचे आहेत, जिथे सर्वात जास्त ओबीसी लोकसंख्या आहे. त्याचप्रमाणे संजय चौरसिया हे ओबीसी तमालो जातीचे आहेत.
ब्राह्मण-राजपूत-भूमिहार चेहरे का नाहीत?
भाजपची पारंपारिक मतपेढी उच्च जातींची आहे. एकेकाळी भाजप ब्राह्मण आणि बनियांचा पक्ष म्हणून ओळखली जात असे. बिहारमध्ये भाजपची सर्वात मोठी ताकद भूमिहार, ब्राह्मण आणि राजपूत समुदायाची आहे. म्हणूनच भाजपने बहुतेकदा उच्च समुदायातील चेहऱ्यांनाच तिकिटे दिली आहेत. २०२४ आणि २०२५ मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झाले तेव्हा भाजपने सवर्ण जातीचा उपमुख्यमंत्री कायम ठेवला.
नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीपूर्वी, सुशील मोदी यांनी नितीश कुमार सरकारमध्ये भाजप कोट्यातून उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, नितीश कुमार एनडीएमध्ये परतले, परंतु भाजपने सुशील मोदींच्या जागी दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केले ज्यात ओबीसी समाजाच्या रेणू देवी आणि वैश्य समुदायातून तारकेश्वर प्रसाद यांना संधी दिली होती.
त्यानंतर २०२४ मध्ये, जेव्हा नितीश कुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले, तेव्हा भाजपने पुन्हा दोन उपमुख्यमंत्री नियुक्त केले. ज्यामध्ये ओबीसी असलेले सम्राट चौधरी यांना उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले, तर भूमिहार सवर्ण जातीचे विजय कुमार सिन्हा यांनाही उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. नोव्हेंबर २०२५ मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तेव्हा भाजपने सम्राट चौधरी यांच्यासोबत विजय कुमार सिन्हा यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान केले.
जातीय घटकाचे व्यवस्थापन करण्याचे भाजपसमोर आव्हान
बिहारच्या राजकारणात जाती समीकरणांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राज्यातील मागास, अत्यंत मागास (ईबीसी), दलित आणि उच्च जातीच्या मतदारांचे संतुलन निवडणुकीच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जाते. भाजपने नेहमीच सवर्ण जातीचा पक्ष म्हणून आपली प्रतिमा कायम ठेवली आहे. नितीश कुमार हे ओबीसी कुर्मी जातीचे असून, भाजपने बिहारमध्ये सातत्याने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून सोबत घेत निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे आता नितीश कुमार यांच्या राज्यसभेतील एन्ट्रीनंतर सामाजिक आणि जातीय संतुलन राखण्यासाठी भाजपनं भाजपने केवळ ओबीसी उमेदवारावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
