Manipur News : केंद्रातील सत्ताधारी एनडीए आघाडीतील घटक पक्ष असलेल्या जेडीयूने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. हा धक्का राष्ट्रीय राजकारणात नाही तर मणिपूर (Manipur News) या राज्यात दिला आहे. नितीश कुमार यांच्या (Nitish Kumar) नेतृत्वातील जेडीयूने मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपुरात जेडीयूचे सहा आमदार होते. यातील पाच आमदार आधीच भाजपात सामील झाले आहेत. आता जेडीयूत फक्त एकच आमदार राहिला आहे. या आमदारानेही सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही. पण हा एक राजकीय संदेश नक्कीच आहे.
महाराष्ट्र फॉर्म्युला बिहारमध्ये नाहीच; भाजपला गरज अन् CM नितीश कुमारच!
मणिपूर जेडीयूचे प्रमुख केएस बिरेन सिंह यांनी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना पत्र पाठवून या घडामोडींची माहिती दिली आहे. फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यात आमच्या पक्षाचे सहा आमदार निवडून आले. यानंतर काही महिन्यांतच पाच आमदार भाजपात सामील झाले. जेडीयू इंडिया आघाडीचा (INDIA Alliance) घटक झाल्यानंतर जेडीयूने पक्षाने भाजप नेतृत्वातील सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. अशा प्रकारे मणिपुरातील जेडीयूच्या एकमेव आमदाराला विधानसभेच्या शेवटच्या सत्रात विरोधकांच्या बेंचवर बसवण्यात आले आहे.
दरम्यान, मागील वर्षात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत जेडीयूचे 12 खासदार निवडून आले. पक्षाने केंद्रात एनडीए आघाडीला पाठिंबा दिला असून पक्ष सत्तेत आहे. जेडीयूचा पाठिंबा मिळाल्याने भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यात मदत मिळाली. भाजपा आणि जेडीयू बिहारमध्येही सहकारी आहेत. या राज्यात याच वर्षात विधानसभा निवडणुका होणार आहेत. जेडीयू अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या तरी भाजपसोबतच आहेत. परंतु, पलटी मारण्यात नितीश कुमार माहीर आहेत. आताही त्यांचं मन पुन्हा बदलू लागल्याचे संकेत या घडामोडीतून मिळाले आहेत.
बिहार विधानसभेत एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार.. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आकडाही सांगितला
जेडीयूच्या आधी मागील वर्षात नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपुरातही सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. तर नितीश कुमार मागील वर्षात इंडिया आघाडी सोडून एनडीएत आले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्र आणि राज्यात एनडीएसाठी जेडीयूचं महत्व वाढलं आहे. अशी परिस्थिती असताना मणिपुरात घडलेली ही राजकीय घडामोड देशाच्या राजकारणात चर्चेची ठरली आहे.