महाराष्ट्र फॉर्म्युला बिहारमध्ये नाहीच; भाजपला गरज अन् CM नितीश कुमारच!
Bihar Politics Nitish Kumar : महाराष्ट्रात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता बिहारमधील राजकारणाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या फॉर्म्युल्याप्रमाणेच भाजप आता बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांचा पत्ता कट करू शकतो. बिहार राज्यातील आगामी (Bihar Elections 2025) विधानसभा निवडणुका नितीश यांच्या चेहऱ्यावरच लढल्या जातील पण जर यश मिळालं तर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत अशा चर्चा आतापासूनच सुरू झाल्या आहेत.
आता बिहारच्या राजकारणात या (Bihar Politics) ज्या चर्चा सुरू झाल्या आहेत त्या निराधार नाहीत. यामागे कारणही आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) एका मुलाखतीत एक मोठं विधान केलं होतं. बिहार विधानसभा निवडणूक कुणाच्या चेहऱ्यावर लढायची याचा निर्णय एनडीएच्या बैठकीत घेतला जाईल. आता अमित शहा यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. अमित शहा यांचं हे वक्तव्य म्हणजे भविष्यात नितीश कुमार मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर राहणार नाहीत. तसेच आगामी निवडणुका नितीश कुमार यांना प्रोजेक्ट करून लढल्या जाणार नाहीत याचे संकेत देत असल्याचे सांगितले जात आहे.
नितीश कुमार यांचं बिहारच्या राजकारणात किती महत्व आहे याचा अंदाज भाजप नेत्यांच्याच वक्तव्यावरून येत आहे. अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी लागलीच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अमित शहा यांचं असं म्हणणं होतं की ते एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि भाजपात कोणताही निर्णय पार्लमेंट बोर्डाच्या बैठकीत घेतला जातो.
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी बिहार पॅटर्न वापरला जाणार? का, वाचा सविस्तर
नितीश कुमारच यापुढे सुद्धा बिहारमध्ये एनडीए आघाडीचं नेतृत्व करत राहतील असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले. जेडीयूच्या नेत्यांना ही गोष्ट माहिती आहे की भाजपला अजूनही नितीश कुमार यांची गरज आहे. त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत नितीश कुमार यांना साईडलाईन करण्याची जोखीम घेणार नाही. नंतर जायस्वाल यांनी केंद्रीय नेतृ्त्वाच्या निर्णयाचा मुद्दा उपस्थित करत आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले.
नितीश कुमारच राहतील मुख्यमंत्री
नितीश कुमार यांचे राजकीय विरोधक चिराग पासवान देखील (Chirag Paswan) नितीश कुमार यांचं समर्थन करत आहेत. नितीश कुमार यांच्यासाठी ही मोठी जमेची बाजू आहे. मागील निवडणुकीत दोन्ही नेत्यांत धुसफूस दिसली होती. परंतु आता बदललेल्या परिस्थितीत दोन्ही नेत्यांनी वाद मिटवून एकमेकांना पूरक भूमिका घेण्याचे निश्चित केले आहे. अशा परिस्थितीत नितीश कुमार यांचं राजकारण दोलायमान झाले असले तरी भाजप त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही असे राजकीय जाणकारांच मत आहे. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत नितीश कुमार एनडीए आघाडीची साथ सोडतील अशी कोणतीच शक्यता दिसत नाही.