Download App

देशात 5 वर्षात एकाही IIT अन् IIM ची स्थापना नाही! मंत्र्यांनेच काढली PM मोदींच्या दाव्यातील हवा

नवी दिल्ली : भारतात मागील 5 वर्षांमध्ये एकाही आयआयटी किंवा आयआयएमची स्थापना झाली नसल्याची माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी आज राज्यसभेत काँग्रेस खासदार कुमार केतकर यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 23 IIT आणि 20 IIM कार्यरत आहेत. तर गेल्या पाच वर्षांत देशात एकूण 242 उच्च शिक्षण संस्था (HEI) स्थापन करण्यात आल्या आहेत, अशीही माहिती दिली आहे. (The Central Government has informed in Rajya Sabha that no IIT or IIM has been established in India in the last 5 years.)

गेल्या 5 वर्षातील 242 नवीन संस्थांच्या यादीमध्ये 90 राज्य विद्यापीठे, 140 राज्य खाजगी विद्यापीठे, 8 केंद्रीय विद्यापीठे आणि 4 डीम्ड विद्यापीठे यांचा समावेश आहे. तर 2015-16 पासून देशभरात एकूण 314 नवीन विद्यापीठे आणि 4 हजार 725 महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती नवीन शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेबाबत आपचे खासदार संदीप कुमार पाठक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, शिक्षण मंत्रालयाने दिली.

काँग्रेसचा पंतप्रधानांवर निशाणा :

गेल्या 5 वर्षात एकही नवीन आयआयटी किंवा आयआयएम नसल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाने राज्यसभेत दिल्यानंतर, काँग्रेसने पंतप्रधानांवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवत काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलद्वारे म्हटले की ,पंतप्रधान मोदी अमेरिकेत म्हणाले की भारतात दरवर्षी आयआयटी आणि आयआयएमची स्थापना केली जात आहे. तर त्याचवेळी केंद्र सरकार राज्यसभेत सांगते की गेल्या पाच वर्षांत एकही नवीन आयआयटी किंवा आयआयएम स्थापित केले गेले नाही. मग पंतप्रधान मोदी इतके खोटे का बोलतात? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी मे 2023 मध्ये अमेरिकेमध्ये म्हणाले होते की, सरकारने गेल्या 9 वर्षांत भारताच्या शिक्षण व्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले आहेत. यात देशभरात आयआयटी, आयआयएमएस, आयआयआयटी आणि एम्ससह अनेक उच्च शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत. 2014 ते 2022 दरम्यान, दरवर्षी नवीन आयआयटी आणि आयआयएमची स्थापना करण्यात आली आहे. यापूर्वी देशात मोजक्याच संस्था होत्या. त्याचप्रमाणे सात दशकांपासून केवळ सात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) देशाची सेवा करत होत्या.

पण आज मागील 7 वर्षांत 15 एम्स बांधण्यात येत आहेत. त्यापैकी काही आधीच कार्यरत झाल्या आहेत. 2014 मध्ये, 80,000 वैद्यकीय जागा उपलब्ध होत्या तर आता 1,70,0000 पेक्षा जास्त जागा आहेत असेही ते म्हणाले होते. स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही 2014 पर्यंत देशात 16 आयआयटी होत्या. पण गेल्या 9 वर्षांत सरासरी, दरवर्षी एक नवीन आयआयटी उघडण्यात आले आहे.

Tags

follow us