EGR Trading : देशात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना पुढील एका वर्षापर्यंत परकीय चलन वाचवण्यासाठी सोने खरेदी करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या आहवानानंतर सोन्यावरील आयात शुल्क 6 टक्क्यांवरुन थेट 15 टक्क्यापर्यंत वाढवल्याने देशात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना वाढत्या महागाईत सोने खरेदीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच NSE कडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
NSE कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 18 मे पासून इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स ट्रेडिंग नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियावर सुरु होणार आहे. यामुळे तुम्ही आता सोन्यात डिजिटल आणि सुरक्षित गुंतवणूक करु शकतात.
EGR ट्रेडिंग 18 मे पासून
NSE ने दिलेल्या माहितीनुसार, EGRs मधील ट्रेडिंग 18 मे पासून सुरु होणार आहे. सोन्यातील गुंतवणूक अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सर्वांसाठी अधिक सुलभ करण्यासाठी EGRs ट्रेडिंग सुरु करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे सोन्याचे ट्रेडिंग हळूहळू मुख्य प्रवाहातील आर्थिक बाजारपेठेच्या व्यवस्थेशी (Ecosystem) जोडले जाईल अशी माहिती NSE ने कडून देण्यात आली आहे.
‘इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स’ (EGRs) म्हणजे काय?
NSE ने दिलेल्या माहितीनुसार, EGR ही एक अशी डिजिटल यंत्रणा आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार प्रत्यक्ष सोन्याची मालकी स्वतःकडे ठेवतो, परंतु त्याला ते सोने प्रत्यक्षपणे (भौतिक स्वरूपात) घरी साठवून ठेवण्याची आवश्यकता नसते. जेव्हा एखादी व्यक्ती EGR खरेदी करते, तेव्हा त्यास समतुल्य प्रमाणात असलेले प्रत्यक्ष सोने एका सुरक्षित तिजोरीत (Vault) त्या व्यक्तीच्या नावावर जमा केले जाते. ही सिस्टीम शेअर बाजारासारखी कार्य करते. शेअर बाजार आणि या सिस्टीममध्ये फरक इतकाच की शेअर बाजारात डिमॅट खात्यामध्ये शेअर्स दिसतात आणि या सिस्टीममध्ये सोन्याचे युनिट्स.
EGRs शी संबंधित असलेले सोने, ‘भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळा’द्वारे (SEBI) नियंत्रित केल्या जाणाऱ्या सुरक्षित तिजोऱ्यांमध्ये साठवून ठेवले जाईल. या व्यवस्थेचा मुख्य फायदा असा आहे की, व्यक्तींना आता सोने घरी साठवून ठेवण्याचा बोजा किंवा बँक लॉकरसाठी अतिरिक्त खर्च करण्याची गरज उरणार नाही. शिवाय, सोन्याची सुरक्षा आणि त्याची शुद्धता यांविषयीच्या चिंताही यामुळे मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. NSE च्या माहितीनुसार, हे सोने आधीच प्रमाणित (Pre-Certified) केलेले असेल आणि सुरक्षितपणे साठवून ठेवले जाईल. यामुळे गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष सोन्याचा भौतिक ताबा न घेताही, सोन्याच्या दरातील चढ-उतारांचा फायदा घेणे शक्य होईल.
तुम्ही किती सोने खरेदी करू शकता?
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता नसते. NSE च्या माहितीनुसार, EGRs विविध वजनांच्या किंवा मूल्यांच्या स्वरूपात उपलब्ध असतील. हे पर्याय 1 किलो, 100 ग्रॅम, 10 ग्रॅम आणि 1 ग्रॅमपासून ते अगदी 100 मिलिग्रॅमपर्यंतच्या लहान प्रमाणातही उपलब्ध असतील. अगदी लहान गुंतवणूकदारही त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार टप्प्याटप्प्याने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकतात.
दिलासा! ‘या’ दिवशी राज्यात दाखल होणार मान्सून; जाणून घ्या हवामान अंदाज
शुद्धता किंवा दरांमध्ये कोणतीही फेरफार नाही
भारतात, सोन्याचे दर शहरानुसार आणि एका सराफाकडून दुसऱ्या सराफाकडे थोडेफार बदलत असतात, ज्यामुळे अनेकदा खरेदीदार संभ्रमात पडतात. संपूर्ण देशभरात सोन्यासाठी एकसमान आणि पारदर्शक दर-निर्धारण यंत्रणा प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट NSE ने ठेवले आहे. या प्लॅटफॉर्मवर ज्या सोन्याचा व्यापार होईल, ते आंतरराष्ट्रीय मानकांनुसार असेल. ज्यामुळे 999 आणि 995 शुद्धतेच्या पातळीची (24 कॅरेट) खात्री मिळेल. ही संपूर्ण प्रणाली नियामक यंत्रणेच्या कक्षेत येत असल्याने, सोन्याच्या शुद्धतेबाबत कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला यात अजिबात वाव नाही.
