Download App

Letsupp Special : कांद्याला कमी लेखू नका; याने अनेक सरकारे घालवलीत… इंदिरा गांधींपासून मनोहर जोशींना दिलाय धक्का

1980 च्या लोकसभा निवडणुका. आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करुन आणि दोन वर्ष आंदोलन करुन सत्तेत आलेलं जनता पक्षाचं सरकार कोसळलं होतं. त्यानंतर तीन वर्षांतच निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्या निवडणुकीत इंदिरा गांधींकडे जनता पक्षाच्या विरोधात अनेक मुद्दे होते, पण इंदिरा गांधींच्या भाषणांमध्ये फक्त कांदेच होते. निवडणुकीच्या प्रचारात त्या कांद्याची माळ घालून फिरत होत्या. त्यामुळेच या निवडणुकीला देशातील पहिली कांद्याची निवडणुकही म्हटले गेले. त्या निवडणुकीत कांद्याचे भाव हा मुद्दा बनवून इंदिरा गांधी सत्तेतही परतल्या, पण सत्तेत येताच कांद्याकडे दुर्लक्ष करण त्यांना खूप महागात पडले. 1980 मध्ये 1 रुपये किलोने मिळणारा कांदा 1981 मध्ये 6 रुपये किलो झाला. त्यावर्षात इंदिरा गांधींना अक्षरशः कांद्याने रडविल होते. (onion issue Indira Gandhi Atal Bihari Vajpayee Manohar Joshi chhagan bhujbal face controversy)

थोडक्यात काय तर कांदा हा आजच नाही तर फार पूर्वीपासून जसा सामन्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे तसाच तो राजकीय नेत्यांच्या अंगावर काटा आणणारही विषय आहे. आजपर्यंत कांद्याने अनेकवेळा राजकीय पक्षांच्या डोळ्यांतून अश्रू आणण्यापासून ते सरकार पाडण्यापर्यंतचे काम केले आहे. कधी आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी कांद्याला निवडणुकीचा मुद्दा बनवून काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणले. पण परत त्याच कांद्याने त्यांना अक्षरशः रडवलं होतं. तर कधी सुषमा स्वराज यांना या कांद्यामुळे सत्ता गमवावी लागली होती. इतकंच नाही तर मनोहर जोशी यांना दिवाळीच्या फराळातही कांदा खावा लागला होता. जाणून घेऊ असेच काही राजकीय किस्से

मनोहर जोशींना दिवाळीच्या फराळात खावे लागले होते कांदे :

1998 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत होते. विरोधी पक्षात होते छगन भुजबळ. दिवाळीचे दिवस होते, अशात कांद्याचे दर गगनाला भिडले होते. हेच निमित्त साधून छगन भुजबळ यांनी तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना दिवाळीच्या फराळात कांदे पाठवले आणि बॉक्सवर लिहिले, ‘दिवाळी हा सण आहे, जिथे तुम्ही काहीतरी मौल्यवान वस्तू भेट म्हणून देता. यावेळी कांदा चांगलाच महागला आहे.” ही उपहासात्मक टीका मनोहर जोशी यांना चांगलीच लागली आणि त्यांनी रेशनकार्डवर कांदा विकण्यास सुरुवात केली ४५ रुपये किलोचा कांदा सामान्यांना १५ रुपये किलोने उपलब्ध करून दिला.

1998: कांद्याने भाजपची 2 राज्यातील सत्ता घालवलीच :

1998 मध्ये दिल्लीत भाजपचे सरकार होते आणि मदन लाल खुराना मुख्यमंत्री होते. कांद्याचे भाव वाढले आणि विरोधी पक्षांनी सरकारला घेराव घातला. दबाव इतका वाढला की खुराना यांना हटवून साहिब सिंग वर्मा यांच्याकडे धुरा देण्यात आली. तरीही भाव कमी झाले नाहीत. भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलले आणि सुषमा स्वराज यांना संधी दिली. कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी सुषमा स्वराज यांनी अनेक पावले उचलली, पण त्या अपयशी ठरल्या. शेवटी कांदा हा प्रमुख निवडणुकीचा मुद्दा बनला आणि भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले.

याशिवाय 1998 मध्येच राजस्थान विधानसभा निवडणुकीतही भाजपला कांद्यामुले पराभव पाहावा लागला होता. त्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर “कांदा आमच्या मागे होता” असं म्हणत भैरोंसिंग शेखावत यांनी पराभवाचे कारण कांदाच असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली होती. असं म्हणतात की त्यावर्षी झालेल्या पोखरण अणू चाचणीवेळी रेडिएशनवर उपाय म्हणून हजारो टन कांदा जमिनीत गाडला गेला. त्यामुळे दिल्ली आणि राजस्थानमध्ये कांद्याचा मोठा तुटवडा पडला आणि दर गगनाला भिडले. त्यामुळे अणू चाचणीसारखे यशस्वी आणि ऐतिहासिक काम करुनही वाजपेयी यांच्या पक्षाला दिल्ली आणि राजस्थानमधील सरकार वाचविता आले नव्हते.

Tags

follow us