Operation Sindoor Indian Army : पहलगाम येथील दहशतवादी हल्ला पाकिस्तानला चांगलाच महागात (OPeration Sindoor) पडला आहे. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. हे भारताच्या ऑपरेशन सिंदूरचं खास वैशिष्ट्य. पण, भारताने पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर घुसून 9 दहशतवादी अड्डेच का उद्धवस्त केले. याच अड्ड्यांची निवड करण्याचं काय कारण होतं याची माहिती आता समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सुरक्षा दलांनी पीओके आणि पाकिस्तानात 9 वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास बारा अतिरेकी ठिकाणांवर हल्ला केला. हे टार्गेट पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटरपर्यंत होते. हल्ला करण्याआधी या ठिकाणांची खात्री करण्यात आली होती. नंतर त्यांना ट्रॅक करण्यात आले आणि एअर स्ट्राइक करुन पूर्ण उद्धवस्त करण्यात आले.
“सिंधूपासून सिंदूरपर्यंत..”15 कठोर निर्णयांनी पाकिस्तानची दमछाक; जाणून घ्या भारताची शौर्यगाथा
भारताने ज्या दहशतवादी तळांना टार्गेट केलं त्यात जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या मुख्यालयाचाही समावेश आहे. तसेच लश्कर-ए-तैयबा आणि हिज्बूल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांनाही नष्ट करण्यात आले. सर्वात मोठा हल्ला बहावलपूरमध्ये झाला. बहावलपूर आंतरराष्ट्रीय बॉर्डरपासून 100 किलोमीटर आत आहे. याच ठिकाणी जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे मुख्यालय होते.
याच पद्धतीने सांबा सेक्टरच्या हद्दीपासून 30 किलोमीटर आता मुरीदके नावाच्या भागात लश्कर-ए-तैयबाचा कॅम्प होता. हा कॅम्पही उद्धवस्त करण्यात आला. मुंबईवरील हल्ल्यातील अतिरेकी येथीलच होते. या ठिकाणी लश्कर-ए-तैयबाचे ट्रेनिंग सेंटर होते. अजमल कसाबने याच ठिकाणी ट्रेनिंग घेतले होते.
सैन्याने तिसरा हल्ला गुलपूर भागात केला. हा परिसर काश्मिरातील पूंछ राजौरीपासून 35 किलोमीटर दूर आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पूंछमधील दहशतवादी हल्ला आणि जून 2024 मध्ये प्रवाशांच्या बसवरील हल्ल्याचे मूळ येथेच होते.
पाकव्याप्त काश्मीरातील तंगधार सेक्टरमध्ये 30 किलोमीटर आत सवाई येथे लश्कर-ए-तैयबाचा कॅम्प होता त्यालाही नष्ट करण्यात आले. हा कॅम्प 20 ऑक्टोबर 2024 रोजी सोनमर्ग, 24 ऑक्टोबर 2024 रोजी गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार होता.
यानंतर सैन्याने पाचवा हल्ला बिलाल कॅम्पवर केला. हा कॅम्प जैश-ए-मोहम्मद संघटनेचा लाँच पॅड म्हणून ओळखला जात होता. यानंतर सहावा हल्ला कोटली कॅम्पवर झाला. हा कॅम्प राजौरी जिल्ह्यापासून एलओसीच्या आत 15 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी लश्कर-ए-तैयबाचे प्रशिक्षण केंद्र होते. या ठिकाणी 50 अतिरेक्यांची राहण्याची व्यवस्था होती.
सातवा हल्ला बरनाला कॅम्पवर होता. हा कॅम्प राजौरी जिल्ह्यासमोर एलओसीपासून फक्त दहा किलोमीटरवर आहे. आठवा हल्ला सरजाल तेहरा कलां कॅम्पवर झाला. पाकिस्तानातील पंजाबच्या नरोवाल जिल्ह्यातील सरजाल तेहरा कलांमध्येही जैश-ए-मोहम्मदचा मुख्य लाँच पॅड होता.
यानंतर नववे आणि शेवटचे टार्गेट होते पाकिस्तानच्या हद्दीतील महमूना कॅम्प. हा कॅम्प आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किलोमीटर आत आहे. हा कॅम्प हिज्बूल मुजाहिदीनचे प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखला जातो. येथील एका आरोग्य केंद्रात हा कॅम्प चालवला जात होता. या केंद्राच्या माध्यमातून जम्मू भागात अतिरेकी घुसखोरी करत होते. या केंद्रात 30 अतिरेकी राहत होते.