नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. यावेळी विरोधी पक्षाकडून कामकाज सुरू होण्यापुर्वीच अदानींच्या मुद्द्यावरून जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.
आज विरोधी पक्षाकडून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हिंडनबर्ग रिपोर्ट आणि अदानी स्टॉक क्रॅशच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्याची तयारी आहे. यासंदर्भात गौतम अदानींच्या नेतृत्वातील समूहाविरूद्ध अमेरिकेतील शॉर्ट-विक्रेता हिंडनबर्ग रिसर्चच्या आरोपांसंदर्भात विरोधी पक्षाने चर्चा करण्याची मागणी केली.
दुसरीकडे विरोधी पक्षाने अधिवेशनादरम्यान केंद्र सरकारला घेरण्यासाठी एक रणनिती तयार करण्यासाठी बैठक घेतली. यामध्ये अदानींच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत कॉंग्रेस, DMK, TMC, SP, JD(U), शिवसेना, CPI(M), CPI, NCP, IUML, NC, AAP आणि केरळ कॉंग्रेसचे नेते उपस्थित होते.