Pakistani PM Shehbaz Sharif Offers Talks With India : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan War) तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी (Pakistani PM Shehbaz Sharif) शांततेबाबत मोठं विधान केलंय. पाकिस्तानी पंतप्रधानांनी गुरुवारी (15 मे) सांगितलं की, ते भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, शाहबाज शरीफ यांचे हे विधान दोन्ही देशांमधील लष्करी कारवाया थांबवण्यासाठी 10 मे 2025 रोजी झालेल्या युद्धबंदी करारावर आहे.
सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी काम करत राहणार भारत-पाकिस्तान DGMO चर्चेत सहमती
शाहबाज शरीफ काय म्हणाले?
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी (Operation Sindoor) पंजाब प्रांताचा दौरा केला. यादरम्यान, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षात सहभागी असलेल्या अधिकारी आणि सैनिकांशी संवाद साधला. त्यांनी म्हटलंय की, आम्ही शांततेसाठी भारताशी चर्चा करण्यास तयार आहोत. शरीफ यांच्यासोबत उपपंतप्रधान इशाक दार, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर होते. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान भारतासोबत चर्चा आणि शांततेच्या अटींमध्ये काश्मीर मुद्द्याचा समावेश करण्याबद्दल बोलले आहे.
पहलगाम हल्ला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या काळात तणाव वाढला होता. या हल्ल्यात 25 भारतीय नागरिकांसह एका नेपाळी नागरिकाचाही मृत्यू झाला होता. याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेच्या एका लहान गट द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली होती, असं वृत्त देखील समोर आलं होतं.
सरकारीबाबू, बिल्डर, राजकारणी यांनी पुण्यातील हजार कोटींची वनजमीन कशी हडपली ? संपूर्ण स्टोरी
ऑपरेशन सिंदूर
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. भारताने 7 मे रोजी पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर नावाची प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू केली. या कारवाईअंतर्गत, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील 9 दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ले केले. ज्यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू झाले. पाकिस्तानने केलेले सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले भारताने हवेतच उद्ध्वस्त केले. याशिवाय पाकिस्तानच्या अनेक प्रांत आणि शहरांमधील लष्करी तळही उद्ध्वस्त करण्यात आले. चार दिवसांच्या सततच्या लष्करी कारवाईनंतर, दोन्ही बाजूंमध्ये युद्धबंदीचा करार झाला. तथापि, युद्धबंदी लागू झाल्यानंतरही भारताने पाकिस्तानवर लादलेले निर्बंध सुरूच ठेवले आहेत.
भारतीय परराष्ट्रमंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी (15 मे 2025) स्पष्टपणे सांगितलं की, जर पाकिस्तान सर्व दहशतवादी पायाभूत सुविधा आणि त्यांच्याशी असलेले संबंध नष्ट करण्यास तयार असेल तरच भारत पाकिस्तानशी चर्चेसाठी तयार असेल. पाकिस्तानशी फक्त दहशतवादावरच चर्चा होईल. पाकिस्तानकडे दहशतवाद्यांची यादी आहे, जी सोपवणे खूप महत्वाचे आहे. पाकिस्तानला काय करायचे हे माहित आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही त्यांच्याशी बोलण्यास तयार आहोत. हा एकमेव विषय आहे ज्यावर चर्चा शक्य आहे, असं देखील जयशंकर यांनी म्हटलं आहे.