Haryana News : हरयाणातील पंचकुलामध्ये अत्यंत (Haryana News) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देहरादून येथील एकाच कुटुंबातील सात जणांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली. सर्व मृतदेह सेक्टर 27 मधील एका घराच्या बाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीत आढळून आले. एकाच कुटुंबातील इतक्या लोकांनी आत्महत्या का केली असा सवाल उपस्थित होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करणारे कुटुंब प्रचंड कर्जात होते.
देहरादून येथील प्रवीण मित्तल त्यांच्या कुटुंबियांसह पंचकुला येथे बागेश्वर धामच्या हनुमान कथेसाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर देहरादूनला माघारी निघाले होते. त्याचवेळी त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. मयतांत प्रवीण मित्तल, त्यांचे आई-वडील, प्रवीण यांची पत्नी, दोन मुली आणि एक मुलाचा समावेश आहे. पोलिसांना या ठिकाणी एक सुसाइड नोट मिळाली आहे. या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सातही मृतदेह सध्या खासगी रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आले आहेत. पंचकुलाचे डीसीपी हिमाद्री कौशिक आणि डीसीपी कायदा सुव्यवस्था अमित दहिया घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमने येथे येऊन काही नमुने गोळा केले आहेत.
अपघातामधून वाचले पण ट्रकने चिरडलं, बीडच्या गढी पुलावर भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू
डीसीपी हिमाद्री कौशिक यांनी सांगितले की एकाच कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केली आहे. हा परिवार देहरादून येथून हनुमंत कथेसाठी पंचकुला येथे आला होता. या कुटुंबार कर्जाचा डोंगर होता. त्यामुळे कदाचित त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आता या मृतदेहांना पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.
प्रवीण मित्तल यांनी अलीकडेच टूर अँड ट्रॅव्हल्सचा बिजनेस सुरू केला होता. व्यवसाय अधिक चांगला करण्यासाठी यात त्यांनी बराच खर्च केला होता. परंतु, त्यांना अपेक्षित असलेले यश मिळालं नाही. व्यवसाय चालला नाही. आपल्याकडील सर्व पैसे त्यांनी या व्यवसायात लावले होते. त्यांच्यावर प्रचंड कर्जही होते. आता घरखर्च होईल इतकेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. याच आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.