Pawan Khera On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेसकड़ूनही त्याला उत्तर देण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. राहुल गांधी यांच्या लंडनमधील विधानावरही पंतप्रधानांनी निशाणा साधला होता, ज्यात त्यांनी भारताच्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले होते.
काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींना उत्तर देताना पवन खेरा म्हणाले की, “तुम्ही नऊ वर्षे तुमच्या पूर्वजावर टीका करत घालवली. गेल्या ७० वर्षांत एकही काम झाले नाही, असे तुम्ही म्हणता, तेव्हा तुम्ही तीन पिढ्यांचा अपमान करत आहात. संसदेत उभे राहून तुम्ही जेव्हा म्हणता, “अकेला सब पर भारी.” तेव्हा जग तुम्हाला पाहत असते.”
कर्नाटकात काय म्हणाले मोदी?
कर्नाटकमध्ये राहुल गांधींवर टीका करताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, “हे माझे भाग्य आहे की काही वर्षांपूर्वी मला लंडनमध्ये भगवान बसवेश्वरांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली, परंतु लंडनमध्येच भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे दुर्दैवी आहे.” ते पुढे म्हणाले, “भारताच्या लोकशाहीची मुळे आपल्या शतकानुशतके जुन्या इतिहासाने रुजलेली आहेत. जगातील कोणतीही शक्ती भारताच्या लोकशाही परंपरांना हानी पोहोचवू शकत नाही.”
हेही वाचा : Budget session: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून होतोय सुरू
काँग्रेसकडून उत्तर
पंतप्रधान मोदींच्या याटीकेला काँग्रेसकडून उत्तर देण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना खेरा म्हणाले, “जेव्हा तुम्ही परदेशी मीडियावर छापे टाकण्याचे आदेश दिलेत, तेव्हा तुम्हाला देशाच्या प्रतिमेची काळजी नव्हती. तुम्ही दक्षिण कोरियामध्ये भारतात जन्म घेणे दुर्दैवी मानले जायचं, असे म्हणाला होता. तेव्हा तुम्ही भारताच्या प्रतिमेचा विचार केला होता का?”
आपकी नीतियों की निंदा कब से देश की निंदा हो गई?
आप सिर्फ़ एक प्रधानमंत्री हैं, ना आप देश हैं, ना भगवान हैं और ना ही सृष्टिकर्ता हैं। https://t.co/QeUOeuOq82— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) March 12, 2023
‘तुम्ही पंतप्रधान आहात, देव नाही’
मोदींवर निशाणा साधत ते खेरा पुढे म्हणाले की, “तुमच्याबद्दल काही गैरसमज आहेत. तुम्ही फक्त पंतप्रधान आहात, देव नाही किंवा तुम्ही सृष्टीनिर्मातेही नाहीत. तुमच्या धोरणांवर टीका केव्हा होत आहे. तेव्हा ती देशावर टीका नसते. स्वतःबद्दलचे हे गैरसमज दूर करा.”
