मुंबई : Paytm या डिजिटल पेमेंट अॅपची मूळ कंपनी असलेल्या ‘One97 कम्युनिकेशन्सने’ तब्बल सहा हजार कर्मचार्यांना नारळ देण्याची तयारी केली आहे. वाढत्या तोट्यातून सावरण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे. 5 हजार ते 6 हजार 300 कर्मचाऱ्यांना घरी घालवून कंपनीचा 400-500 कोटी रुपये वाचवण्याचे नियोजन आहे. फायनान्शियल एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Paytm parent company One97 Communications is looking to significantly reduce its employee )
फायनान्शियल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हंटल्याप्रमाणे, 2023 या आर्थिक वर्षात 32 हजार 798 कर्मचारी ऑन रोल होते. तर 29 हजार 503 जण सक्रियपणे काम करत होते. यातील प्रति कर्मचाऱ्याचा सरासरी खर्च सात लाख 87 हजार होता. 2024 या आर्थिक वर्षात हाच खर्च तब्बल 34 टक्क्यांनी वाढून 10 लाख 60 हजारांवर पोहचला. त्यामुळे कंपनीला केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारावर तीन कोटी 124 लाख रुपये खर्च करावे लागत आहेत.
कंपनीने गुंतवणूकदारांच्या प्रेझेंटेशनमध्ये नमूद केल्याप्रमाणे तंत्रज्ञान, व्यापारी विक्री आणि वित्तीय सेवांमधील गुंतवणुकीमुळे कर्मचाऱ्यांवरील खर्च वाढला आहे. हा खर्च कमी करण्यासाठी ‘One97 कम्युनिकेशन्सने’ यापूर्वीच कर्मचाऱ्यांना घरी घालवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. डिसेंबरमध्ये ऑपरेशन्स सुरळीत करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना टर्मिनेट केले आहे, असेही फायनान्शियल एक्सप्रेसने सांगितले आहे. यापुढे या क्षेत्रांमधील सेवा सुरु ठेवण्यासाठी कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार आहे.
आधीच तोट्यात असलेल्या Paytm कंपनीच्या अडचणीत जानेवारी-मार्च या तिमाहीतील निर्बंधांमुळे आणखी वाढ झाली. भारतीय रिझर्व्ह बँकने Paytm पेमेंट्स बँकेवर अनेक निर्बंध लादले. यात नवीन ठेवी स्वीकारण्यास आणि क्रेडिट व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली. या निर्बंधांचा कंपनीच्या चौथ्या तिमाहीच्या बॅनेन्स शीटवर लक्षणीय परिणाम झाला. जानेवारी-मार्च तिमाहीत कंपनीला मागील वर्षीच्या 168 कोटी रुपयांच्या तुलनेत 550 कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यानंतर आता खर्च वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे.