Download App

Air India : “माझी ड्युटी संपली” : 350 प्रवासी अन् विमान जागेवर सोडून पायलट घराकडे

रविवारची सकाळ. राजधानी दिल्लीत तुफान पाऊस कोसळत होता. दिल्लीकर या पावसात चिंब भिजत असतानाच इकडे या पावसाचा फटका विमान प्रवासाला बसला. खराब हवामानामुळे दिल्ली विमानतळावरुन उड्डाणांचे नियोजन करण्यात अडचणी येत होत्या. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांच्या लँडिंग आणि टेक ऑफसाठी एटीसीकडून क्लिअरन्स मिळत नव्हते. (The pilot of the flight refused to take the plane to Delhi, saying that the duty hours were over.)

परिणामी लंडनहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान AI-112 दिल्लीत उतरू शकले नाही. विमानाने काही वेळ आकाशात घिरट्या घातल्या. 10 मिनिटांनंतर ते विमान जयपूरच्या दिशेने वळवण्यात आले. याशिवाय गल्फ एअरचे GF-13:बहारीन ते दिल्ली, एअर इंडियाचे AI-948:दुबई ते दिल्ली, स्पाइसजेटचे SG-8169:गुवाहाटी ते दिल्ली आणि SG-8184:पुणे ते दिल्ली ही विमान देखील जयपूरच्या दिशेने वळविण्यात आली.

पायलट म्हणाला- माझी ड्युटी संपली :

सुमारे 2 तासांनंतर हवामान चांगले झाले, दिल्ली एटीसीकडून क्लिअरन्स मिळाल्यानंतर एकामागून एक विमानं जयपूरमधून दिल्लीला रवाना करण्यात आली. मात्र, एअर इंडियाचे AI-112 लंडन-दिल्ली हे विमान तीन तासांनंतरही जागेवरच उभे होते. कारण विमानात पायलटच नव्हता. प्रवाशांनी चौकशी केली असता त्यांना समजले की, ड्युटीचे तास संपले असं, सांगून पायलट विमानातून खाली उतरला आहे. त्याने विमान दिल्लीला नेण्यास नकार दिला.

प्रवाशांना सहन करावा लागला नाहक मनस्ताप :

पायलटच्या या भूमिकेमुळे पहाटे 4 वाजता दिल्लीला पोहोचणे अपेक्षित असलेले विमान बराच वेळ जयपूर विमानतळावर अडकून पडले होते. सुमारे पाच तासानंतर 350 प्रवाशांपैकी काही प्रवाशांना बसने दिल्लीला पाठवण्यात आले. तर दुपारी 2 वाजता उर्वरित प्रवाशांना आणखी एका क्रुची मदत घेऊन दिल्लीला पाठवण्यात आले.

मात्र या सर्व प्रकारानंतर एअर इंडियाने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, या प्रकरणाची वस्तुस्थिती जशी सांगितली जात आहे तशी नाही. लंडन-दिल्ली AI-112 विमान खराब हवामान आणि दिल्लीतील खराब दृश्यमानतेमुळे पहाटे 4 वाजता जयपूरला वळवण्यात आले. दिल्लीतील हवामान सुधारण्याची आणि टेक ऑफ होण्याची वाट पाहत असताना, कॉकपिट क्रू “फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन” अंतर्गत आला.

“फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन” म्हणजे फ्लाइट ड्युटीची मर्यादा. नियामक प्राधिकरणांनी निर्धारित केल्यानुसार पायलट यानंतर फ्लाइट चालवू शकत नाहीत. एअर इंडिया आपल्या प्रवाशांच्या आणि क्रूच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि ऑपरेशनल प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करून फ्लाइट चालवण्यासाठी ताबडतोब नवीन क्रूची व्यवस्था करते.

Tags

follow us