’56 वर्षांच्या तरुणाची नाही, 28 वर्षांच्या तरुणांची गोष्ट करतोय’; मोदींचा राहुल गांधींना टोला

स्कायरुट एअरोस्पेसमध्ये जे तरुण काम करतात, त्यांचे सरासरी वय २८ वर्ष आहे. अशा तरुणांनी हे काम करून दाखवले आहे.

PM Modi Vs Rahul Gandhi

PM Modi Vs Rahul Gandhi

PM Modi Monsoon Session 2026 : ‘स्कायरूट’ या स्टार्टअपमधील टीमचे सरासरी वय केवळ 28 वर्षे आहे. या तरुणांनी भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मी कोणत्या 56 वर्षांच्या तरुणाबद्दल बोलत नाही, तर 28 वर्षांच्या त्या तरुणांबद्दल बोलत आहे, जे देशाचा मान जगभरात उंचावत आहेत. ते खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहेत.” असे म्हणत संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला.

भारताच्या कामगिरीचा उल्लेख

मोदी म्हणाले की, गेल्या महिनाभरात भारताने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. गेल्या वर्षी याच काळात एक भारतीय नागरिक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचला होता, तर आता भारतीय स्टार्टअपने अवकाश क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. या यशामुळे देशातील नव्या पिढीच्या क्षमतेवर जगाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

जागतिक संकटातही भारताची दमदार अर्थव्यवस्था

जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या. पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खत आणि रसायनांच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. तरीही भारताने 7.7 टक्के आर्थिक विकासदर कायम राखत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान टिकवून ठेवल्याचे मोदी यांनी सांगितले.

‘रिफॉर्म एक्सप्रेस’मुळे शक्य झालेली प्रगती

पंतप्रधानांनी सरकारच्या सुधारणांचा उल्लेख करत राजस्थानमधील नव्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन, तिसऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पाची सुरुवात आणि भारताच्या हायड्रोजन ट्रेन प्रकल्पाचा उल्लेख केला. या सर्व यशामागे शास्त्रज्ञ, अभियंते, उद्योजक आणि कामगारांचे परिश्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

संसदेत तथ्य आणि तर्कांवर चर्चा व्हावी

मान्सून अधिवेशनाबाबत बोलताना मोदी म्हणाले, “जिथे तथ्य आणि तर्क असतात, तिथे गोंधळाला जागा नसते.” संसदेत सर्व पक्षांनी सकारात्मक चर्चा करून देशहिताच्या मुद्द्यांवर सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मान्सून अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केलेल्या या भाषणात पंतप्रधानांनी देशातील तरुण स्टार्टअप्सच्या यशाचे कौतुक करताना राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला लगावल्याने त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version