Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गँगचे 7 शूटर्सना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Special Cell) ही कारवाई केली आहे. माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संपूर्ण देशात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संबंधित ठिकाणी छापे टाकून ही कारवाई केली आहे.
स्पेशल सेलने सर्व शूटर्सना पंजाब आणि आसपासच्या राज्यांतून अटक केली आहे. स्पेशल सेलने शूटर्सकडून शस्त्रेही जप्त केली आहे. स्पेशल सेलच्या छाप्यानंतर 7 शूटर्सना अटक करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे एनआयएने (NIA) लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. अनमोल बिश्नोई उर्फ भानू हा देखील गँगस्टर गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येप्रकरणी आरोपी आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या अटकेची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अनमोल बिश्नोई गेल्या एप्रिलमध्ये अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत कथित सहभागा असल्याचा दावा एनआयएकडून करण्यात आला आहे. माहितीनुसार, अनमोल बिश्नोई उर्फ भानू हा कॅनडामध्ये राहणारा असून तो नियमितपणे अमेरिकेत जात असतो अशी माहिती मिळाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे अनमोलचा हात असल्याची माहिती देखील एनआयएला मिळाली आहे. तर दुसरीकडे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या एका आरोपीला जामीन देण्यास नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
अनमोल बिश्नोईच्या सांगण्यावरून सलमानला मारण्याच्या उद्देशाने आरोपींची गोळीबार केला असं न्यायालयाने म्हटले आहे. लॉरेन्स सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे. सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अनमोल बिश्नोईविरोधात लुकआउट सर्कुलरही जारी करण्यात आले होते.