Key Point’s Of Prashant Kishor Win In Bankipur : बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवत मोठा राजकीय धक्का दिला आहे. जवळपास तीन दशकांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघातील निकाल केवळ एका जागेपुरता मर्यादित नसून, तो बिहारच्या बदलत्या राजकीय समीकरणांचा संकेत मानला जात आहे. प्रशांत किशोर यांचा हा विजय आणि भाजपचा पराभव यामागे अनेक राजकीय, संघटनात्मक आणि स्थानिक कारणे असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. 2025 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान अध्यक्ष नितीन नवीन यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रेखा कुमारी यांचा 51,936 मतांच्या फरकाने पराभव करून ही जागा जिंकली होती. पण, आता 30 वर्षांपासून भाजपचा गड असलेल्या बांकीपूरमध्ये किशोर यांच्या दणदणीत विजयामुळे सुरूंग लागला आहे.
1) उमेदवार बदलण्याचा निर्णय भाजपला महाग?
बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने सुरुवातीला अभिषेक कुमार सिन्हा (बंटी) यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी वैयक्तिक व कौटुंबिक कारणांमुळे उमेदावारी मागे घेतली. त्यानंतर भाजपने ऐन वेळी नीरज कुमार सिन्हा यांना पक्षाचे नवीन उमेदवार म्हणून घोषित केले होते. या घडामोडींमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि विरोधकांना भाजपमध्ये सर्व काही सुरळीत नाही असा प्रचार करण्याची संधी मिळाली. याच गोष्टीचा किशोर यांना फायदा झाल्याचे चित्र आहे.
2) प्रशांत किशोरांची ‘हाय-रिस्क’ रणनीती यशस्वी
सुरक्षित मतदारसंघ निवडण्याऐवजी प्रशांत किशोर यांनी जाणीवपूर्वक भाजपचा मजबूत गड असलेला बांकीपूर निवडला. त्यांनी जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाऐवजी विकास, शिक्षण, रोजगार आणि सुशासन या मुद्द्यांवर प्रचार केंद्रित केला. त्यामुळे शहरी आणि सुशिक्षित मतदारांमध्ये त्यांची प्रतिमा अधिक मजबूत झाली.
3) स्थानिक असंतोषाचा फायदा
अनेक मतदारांमध्ये भाजप हा मतदारसंघ गृहीत धरत आहे अशी भावना निर्माण झाल्याचे स्थानिक चर्चांमधून दिसून आले. काही पारंपरिक भाजप समर्थकांनीही उमेदवारापेक्षा पर्याय म्हणून प्रशांत किशोर यांना पसंती दिल्याचे स्थानिक मतप्रवाहातून समोर आले. मात्र, हे मत सर्व मतदारांचे प्रतिनिधित्व करत नाही.
4) जन सुराजचे दीर्घकालीन ग्राउंडवर्क
गेल्या काही वर्षांपासून प्रशांत किशोर यांनी बिहारभर ‘जन सुराज’ अभियानाच्या माध्यमातून गावागावात संघटन उभारली. ही निवडणूक अचानक लढवलेली नव्हती, तर अनेक वर्षांच्या संपर्क मोहिमेचा परिणाम असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. त्यामुळे या पोटनिवडणुकीत किशोर यांना याच ग्राउंडवर्कचा फायदा झाल्याचे समोर आले आहे.
5) भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्येही बदलाचे संकेत
बांकीपूर हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे या मतदारसंघातील पराभव केवळ जागा गमावण्यापुरता मर्यादित नसून, पक्षाच्या पारंपरिक मतदारांमध्येही बदलाची इच्छा निर्माण होत असल्याचा संदेश या निकालातून गेल्याचे विश्लेषण केले जात आहे.
6) Gen Z आणि शहरी मतदार ठरले निर्णायक
सोशल मीडिया, डिजिटल प्रचार आणि थेट संवाद यांचा प्रशांत किशोर यांनी मोठ्या प्रमाणावर वापर केला. रोजगार, शिक्षण, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि प्रशासन यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी तरुण मतदारांना लक्ष्य केले. त्यामुळे प्रथमच मतदान करणाऱ्या आणि शहरी मतदारांचा काही प्रमाणात कल त्यांच्या बाजूने झुकल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
7) भाजप नेमकी कुठे चुकली?
– मजबूत बालेकिल्ला असल्याने मतदारसंघ गृहीत धरल्याची धारणा.
– उमेदवार बदलल्यामुळे संघटनात्मक संदेश कमकुवत झाला.
– स्थानिक मुद्द्यांपेक्षा पारंपरिक राजकारणावर अधिक भर.
– प्रशांत किशोर यांच्या व्यक्तिमत्त्वकेंद्री प्रचाराला प्रभावी प्रत्युत्तर देण्यात अपयश.
– तरुण आणि शहरी मतदारांपर्यंत अपेक्षित पद्धतीने पोहोचण्यात मर्यादा.
बिहारच्या राजकारणासाठी याचा अर्थ काय?
बांकीपूरचा निकाल हा केवळ एका पोटनिवडणुकीचा निकाल नाही. तो बिहारमध्ये जन सुराजला नवसंजीवनी देणारा आणि प्रशांत किशोर यांना केवळ निवडणूक रणनीतीकार नव्हे, तर जनाधार असलेला नेता म्हणून उभे करणारा टप्पा मानला जात आहे. दुसरीकडे, भाजपसाठी हा निकाल संघटन, उमेदवार निवड आणि शहरी मतदारांशी संवाद या तीन बाबींचा नव्याने आढावा घेण्याचा इशारा मानला जात आहे. मात्र, एका पोटनिवडणुकीच्या निकालावरून संपूर्ण बिहारचे राजकीय चित्र बदलले आहे, असा निष्कर्ष काढणे अद्याप घाईचे ठरेल. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये हा कल कायम राहतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष असेल.
