बिहारमधील बांकीपूर आणि मध्य प्रदेशमधील (Vote) दतिया विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ३० जुलै रोजी पार पडली असून ३ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘रुद्र रिसर्च अँड अॅनालिटिक्स, पुणे’ या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार बिहारच्या बांकीपूर मतदारसंघात जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांचा तर मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंह यांच्या विजयाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रुद्र रिसर्चने दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदारांशी संवाद, स्थानिक राजकीय परिस्थिती, सामाजिक समीकरणे आणि प्रचाराचा प्रभाव यांचा अभ्यास करून हा एक्झिट पोल तयार केल्याचा दावा केला आहे. बांकीपूर मतदारसंघात एकूण ३४.३० टक्के मतदान झाले. या मतदारसंघात भाजपचे नीरज कुमार सिन्हा, जन सुराजचे प्रशांत किशोर आणि राजदच्या रेखा कुमारी गुप्ता यांच्यासह २५ उमेदवार रिंगणात होते.
कायद्याचा पेपरफुटी रोखण्याऐवजी त्यानंतरच्या कारवाईवरच भर; सीजेपीचे अभिजीत दिपकेंना वेगळाच संशय
एक्झिट पोलनुसार प्रशांत किशोर यांना सुमारे ५० टक्के, भाजपचे नीरज कुमार सिन्हा यांना ३६ टक्के, राजदच्या रेखा कुमारी गुप्ता यांना १० टक्के, तर इतर उमेदवारांना ४ टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रशांत किशोर सुमारे १८ हजार मतांच्या फरकाने आघाडीवर राहू शकतात, असा अंदाज संस्थेने व्यक्त केला आहे.
रुद्र रिसर्चच्या मते, प्रशांत किशोर यांची सुशिक्षित व पर्यायी नेतृत्वाची प्रतिमा, युवा मतदारांचा वाढता पाठिंबा, पेपर लीक आंदोलनाचा प्रभाव, बेरोजगारी, स्थानिक प्रश्नांवरील प्रचार, सोशल मीडियावरील सक्रियता आणि काही प्रमाणातील सत्ताविरोधी वातावरण यांचा जन सुराजला फायदा झाल्याचे दिसून आले. तर भाजपच्या बाजूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, मजबूत संघटनात्मक यंत्रणा, वरिष्ठ नेत्यांचा प्रचार आणि पारंपरिक मतदारांचा पाठिंबा हे महत्त्वाचे घटक ठरल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे, मध्य प्रदेशातील दतिया विधानसभा मतदारसंघात ७१.४४ टक्के मतदान झाले. येथे भाजपचे आशुतोष तिवारी, काँग्रेसचे घनश्याम सिंह आणि आझाद समाज पार्टीचे दामोदर सिंह यादव यांच्यात प्रमुख लढत झाली. एक्झिट पोलनुसार काँग्रेसचे घनश्याम सिंह यांना ४४ टक्के, भाजपचे आशुतोष तिवारी यांना ३९ टक्के, आझाद समाज पार्टीचे दामोदर सिंह यादव यांना १५ टक्के, तर इतरांना २ टक्के मते मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घनश्याम सिंह सुमारे ७,८५३ मतांच्या फरकाने विजयी होऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दतियामध्ये काँग्रेसचे उमेदवार घनश्याम सिंह यांची स्वच्छ प्रतिमा, स्थानिक पातळीवरील अनुभव, भाजपमधील कथित नाराजी, काही पदाधिकाऱ्यांचे काँग्रेसमध्ये प्रवेश, ग्रामीण भागातील वातावरण, शेतकरी व युवकांमधील असंतोष आणि सत्ताविरोधी भावना यांचा काँग्रेसला फायदा झाल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. तर भाजपच्या बाजूने मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी केलेला प्रचार महत्त्वाचा ठरल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
रुद्र रिसर्चने स्पष्ट केले आहे की, बांकीपूरमध्ये २,५०० तर दतियामध्ये २,४२५ मतदारांच्या फेस-टू-फेस सर्वेक्षणावर हा एक्झिट पोल आधारित असून मतांच्या टक्केवारीच्या अंदाजामध्ये ±५ टक्के त्रुटीची मर्यादा असू शकते. त्यामुळे अंतिम निकाल ३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
