दिग्गजांना जिंकवणारा ‘चाणक्य’ आता स्वतः जिंकला; प्रशांत किशोर यांची प्रेरणादायी कहाणी

20 मार्च 1977 रोजी बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोनार गावात प्रशांत किशोर यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब बक्सर येथे स्थायिक झाले.

Prashant Kishor Success Story

Prashant Kishor Success Story

Prashant Kishor Success Story : एकेकाळी देशातील दिग्गज नेत्यांना निवडणुका जिंकून देण्यासाठी पडद्यामागून रणनीती आखणारे प्रशांत किशोर (PK) आता स्वतःच राजकीय रणांगणात उतरले आहेत. ‘चुनावी चाणक्य’ म्हणून देशभरात ओळख निर्माण केलेल्या प्रशांत किशोर यांनी बिहारमधील चर्चित बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवत आपल्या सक्रिय राजकीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली आहे. मात्र, हा प्रवास थेट राजकारणापासून सुरू झालेला नाही. बिहार बोर्डातून शिक्षण, लखनऊ आणि हैदराबादमधील उच्च शिक्षण, संयुक्त राष्ट्रसंघाशी (UN) तब्बल आठ वर्षे काम आणि त्यानंतर देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतीकार म्हणून मिळवलेली ओळख… अशा अनेक टप्प्यांतून घडलेली ही यशोगाथा आज चर्चेचा विषय ठरली आहे.

Bankipur Result : भाजपचा 30 वर्षांचा अभेद्य किल्ला भेदणाऱ्या प्रशांत किशोर यांच्या विजयाचं विश्लेषण

बिहारमध्ये शिक्षण, पुढे लखनऊ आणि हैदराबादपर्यंत प्रवास

20 मार्च 1977 रोजी बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोनार गावात प्रशांत किशोर यांचा जन्म झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब बक्सर येथे स्थायिक झाले. त्यांनी दहावीचे शिक्षण बिहार स्कूल परीक्षा बोर्डांतर्गत बक्सरमधील एम. पी. हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर पटना सायन्स कॉलेजमधून बारावीचे शिक्षण घेतले.

उच्च शिक्षणासाठी त्यांनी लखनऊ विद्यापीठात प्रवेश घेतला आणि बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA) ही पदवी मिळवली. त्यानंतर हैदराबादमधील अॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया (ASCI) येथून मास्टर ऑफ हेल्थकेअर अॅडमिनिस्ट्रेशन (MHA) ही पदव्युत्तर पदवी घेतली.

फ्रान्समध्ये शिकले फ्रेंच भाषा

शिक्षणाची ओढ इथेच थांबली नाही. 2010 मध्ये प्रशांत किशोर फ्रान्समध्ये गेले आणि तेथील CAVILAM Vichy संस्थेत फ्रेंच भाषेचे शिक्षण घेतले. या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक आणि प्रशासकीय अनुभवही मिळवला.

संयुक्त राष्ट्रसंघासोबत आठ वर्षांचा प्रवास

राजकारणात येण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी जवळपास आठ वर्षे संयुक्त राष्ट्रसंघ (UN) समर्थित सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये काम केले. सार्वजनिक आरोग्य, विकास आणि प्रशासनाशी संबंधित विविध प्रकल्पांवर काम करताना त्यांना धोरणात्मक नियोजन, प्रशासन आणि व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. याच अनुभवामुळे पुढे त्यांची रणनीती आखण्याची क्षमता अधिक विकसित झाल्याचे मानले जाते.

Shivsena Vs BJP : शिंदेंची भाजपवर मात GenZ मतांसाठी आखला खास ‘मास्टर’ प्लॅन….

UNची नोकरी सोडून राजकारणात एन्ट्री

UNशी संबंधित काम सोडल्यानंतर त्यांनी निवडणूक रणनीतीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (I-PAC) या संस्थेची स्थापना करून त्यांनी देशातील अनेक प्रमुख नेते आणि राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखली. नरेंद्र मोदी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल यांसह अनेक नेत्यांच्या यशस्वी प्रचार मोहिमांमध्ये त्यांचे नाव चर्चेत आले.

स्वतःचा पक्ष, स्वतःची लढाई

अनेक वर्षे इतरांसाठी रणनीती आखल्यानंतर प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी ‘जन सुराज’ या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी बिहारच्या राजकारणात थेट प्रवेश केला आणि बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत स्वतः उमेदवारी घेत विजय देखील मिळवला.

पहिल्याच निवडणुकीत मोठा विजय

बांकीपूर हा भाजपचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जात होता. अशा मतदारसंघातून निवडणूक लढवत प्रशांत किशोर यांनी विजय मिळवला. त्यामुळे ‘चुनावी चाणक्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणनीतीकाराने आता स्वतःची राजकीय ताकदही सिद्ध केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बाब्बो! फक्त एक निवडणुकीसाठी १०० कोटी; प्रशांत किशोरांचा मोठा खुलासा

रणनीतीकार ते नेता… नवा अध्याय

आतापर्यंत इतरांना सत्तेपर्यंत पोहोचवणारे प्रशांत किशोर आता स्वतः नेतृत्वाच्या भूमिकेत आले आहेत. UNमधील अनुभव, उच्च शिक्षण, निवडणूक व्यवस्थापनातील दीर्घ अनुभव आणि जन सुराजच्या माध्यमातून उभारलेले संघटन याच्या जोरावर त्यांनी बिहारच्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र जागा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका किती प्रभावी ठरते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version