बाब्बो! फक्त एक निवडणुकीसाठी १०० कोटी; प्रशांत किशोरांचा मोठा खुलासा
Prashant Kishor : निवडणुकीचं गणित ठरवत राजकारणात आलेले जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. ज्यावेळी मी निवडणुकीची रणनीती ठरवत होतो तेव्हा कोणताही राजकीय पक्ष किंवा नेत्याला फक्त एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त शुल्क घेत होतो. सध्या देशातील दहा राज्यांत त्यांच्या सल्ल्यानुसार बनलेले सरकार कार्यरत आहे असा दावा केला.
बिहारमधील पोटनिवडणुकीत प्रचारादरम्यान प्रशांत किशोर यांनी हा खुलासा केला. १३ नोव्हेंबर रोजी बिहारमधील चार मतदारसंघांत पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच प्रशांत किशोर यांचा पक्ष आहे. बेलागंज, इमामगंज, रामगढ आणि तरारी या चार मतदारसंघात प्रशांत किशोर यांनी उमेदवार दिले आहेत.
बिहारच्या राजकारणात नवा भिडू; प्रशांत किशोरांचा जनसुराज कुणाला देणार धक्का?
या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रशांत किशोर स्वतः मैदानात उतरले आहेत. आतापर्यंत फक्त निवडणुकीची रणनीती ठरवत असलेले प्रशांत किशोर पहिल्यांदाच थेट राजकारणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी या पहिल्याच निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत.
या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. ३१ ऑक्टोबर रोजी प्रशांत किशोर यांनी बेलागंज येथे पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. यावेळी किशोर म्हणाले, मला नेहमीच विचारलं जातं की अभियानासाठी पैसे कुठून आणले जातात. याचं उत्तर देताना प्रशांत किशोर म्हणाले, कोणताही राजकीय पक्ष असो किंवा राजकीय नेता यांना निवडणुकीत सल्ला देण्यासाठी शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त फी घेत होतो.
माझ्या सल्ल्यानुसार देशातील दहा राज्यांत सरकार आहे. तर मग आम्हाला अभियानासाठी तंबू लावण्यासाठी पैसे मिळणार नाहीत का. आम्हाला इतकं कमजोर समजण्याचं काय कारण. आम्ही एका निवडणुकीत सल्ला देतो तर आमची फी सुद्धा शंभर कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्तच असते असे प्रशांत किशोर म्हणाले.
बिहारी राजकारणात ट्विस्ट! नव्या राजकीय पक्षाची एन्ट्री; प्रशांत किशोर यांची घोषणा
दरम्यान, प्रशांत किशोर यांनी दोन वर्षांपूर्वी चंपारण येथून तीन हजार किलोमीटरची पदयात्रा सुरू केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी पक्ष स्थापन करून खऱ्या अर्थाने राजकारणात उडी घेतली. पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्या संबंधित कामकाजाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच मोठ्या निवडणुकीत या पक्षाचे चार उमेदवार नशीब आजमावत आहेत. पार्टीच्या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यासाठी अधिकृत संचालन समितीत २५ सदस्य आहेत. त्यानुसार पक्षाचे कामकाज चालत आहे.