नवी दिल्ली : “संसदेच्या आवारात आदरणीय उपराष्ट्रपती यांचा ज्या प्रकारे अपमान झाला ते पाहून मी निराश झाले आहे”, असे म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या व्यंगाची नक्कल करणाऱ्या खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee’ )यांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली. बॅनर्जी यांनी संसद भवनाबाहेर निदर्शने करत असताना जगदीप धनखड (Jandeep Dhankhad) यांची नक्कल केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरुन त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. आता त्यांच्या याच कृतीवर राष्ट्रपतींनीही नाराजी व्यक्त केली आहे. (President Draupadi Murmu expressed displeasure at MP Kalyan Banerjee’s act of mimicking Vice President Jandeep Dhankhad.)
ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त करताना राष्ट्रपती द्रौपदी यांनी मुर्मू म्हणाल्या, ‘संसदेच्या आवारात आपल्या आदरणीय उपराष्ट्रपतींचा ज्या प्रकारे अपमान झाला ते पाहून मी निराश झाले. निवडून आलेले लोकप्रतिनिधी अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगू शकतात. मात्र त्यांचे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य सन्मान आणि शिष्टाचाराच्या चौकटीमध्ये असावे. ही एक संसदीय परंपरा आहे, याचा आपल्या अभिमान आहे आणि भारतातील जनतेने ही परंपरा कायम राखावी अशी अपेक्षा आहे.
कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याची घटना दुर्दैवी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. धनखड यांनी ट्विटरवर पोस्ट करुन सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी फोन करुन या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. भारतात उपराष्ट्रपतीसारखे घटनात्मक पद असलेल्या संसदेत असे घडणे दुर्दैवी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवाय गेल्या 20 वर्षांपासून आपणही अशाप्रकारचा अपमान सहन करत आहोत, असेही पंतप्रधानांनी सांगितले. त्यावर “मी पंतप्रधान मोदी यांना सांगितले, काही लोकांच्या कृती मला माझे कर्तव्य पार पाडण्यापासून आणि आमच्या संविधानात अंतर्भूत तत्त्वे राखण्यापासून रोखू शकत नाहीत. त्या मूल्यांसाठी मी बांधील आहे. कोणताही अपमान मला माझा मार्ग बदलण्यास भाग पाडू शकत नाही, असाही निर्धार जगदीप धनखड यांनी व्यक्त केला.
19 डिसेंबरला संसदेच्या बाहेर निदर्शने करताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या व्यंगाची नक्कल केली. या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता धनकड यांची नक्कल करणाऱ्या कल्याण बॅनर्जींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे धनखड यांना अपमानित करण्याचा मुळीच हेतू नव्हता असे म्हणत मिमिक्री एक कला असल्याचे स्पष्टीकरण कल्याण बॅनर्जी यांनी दिले आहे. उपराष्ट्रपतींबद्दल माझ्या मनात खूप आदर असल्याचे सांगत पंतप्रधांनीदेखील मिमिक्री केल्याची संदर्भ बॅनर्जी यांनी दिला आहे.