Race among veterans for the post of Chief Minister in Kerala : केरळ विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान समोर येत असलेले सुरूवातीचे कल राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवू शकतात, असे चित्र दिसत आहे. जवळपास दहा वर्षांनंतर काँग्रेस नेतृत्वाखालील युडीएफ आघाडी सत्तेत पुनरागमन करताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या उपलब्द्ध माहितीनुसार, युडीएफमध्ये काँग्रेस सुमारे 49 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडियन युनियन मुस्लिम लीग 17 जागांवर पुढे आहे. दुसरीकडे एलडीएफ आघाडीत सीपीआय(एम) 29 आणि सीपीआय 12 जागांवर आघाडीवर असून, केरळ काँग्रेस (एम) 4 जागांवर आघाडी राखून आहे.
या पार्श्वभूमीवर आता सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, जर युडीएफ सत्तेत आली, तर काँग्रेस मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड करणार? पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची नावे या शर्यतीत चर्चेत आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य दावेदारांमध्ये व्ही. डी सतीशन यांचं नाव आघाडीवर मानलं जात आहे. ते सध्या केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत आणि 2001 पासून एर्नाकुलम जिल्ह्यातील पारवूर मतदारसंघातून सलग विजयी होत आहेत. त्यांना IUML सारख्या सहयोगी पक्षांचा देखील पाठिंबा लाभत आला आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी केरळ उच्च न्यायालयात वकिली केली असून, ते कामगार संघटनांशी देखील जोडलेले होते.
याशिवाय सनी जोसेफ यांचे नाव देखील चर्चेत आहे. ते सध्या केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात विद्यार्थी राजकारणातून केली असून, कन्नूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून देखील काम पाहिले आहे. सानी वकील म्हणून ते समर्थकांमध्ये ओळखले जातात.
वरिष्ठ नेते रमेश चेन्निथला हे देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एक मजबूत दावेदार मानले जातात. ते काँग्रेस कार्यसमितीचे स्थायी आमंत्रित सदस्य असून हरीपड मतदारसंघातून अनेक वेळा निवडून आले आहेत. 2016 ते 2021 या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले, तसेच ओमन चांडी सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे.
याच यादीत के. सी. वेणुगोपाल यांचा देखील समावेश आहे. ते सध्या लोकसभेचे खासदार असून काँग्रेसचे प्रमुख रणनीतीकर मानले जातात. पक्षाच्या संघटनात्मक निर्णयांमध्ये त्यांची महत्वाची भूमिका असते.
तसेच शशी थरूर यांचे नाव देखील मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. तिरुवनंतपूरमचे खासदार असलेले शशी थरूर आपल्या प्रगतशील विचारांसाठी ओळखले जातात, राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात जवळपास 29 वर्षे काम केले आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत विचारले असता शशी थरूर यांनी स्पष्ट केले की, पक्षामध्ये यासाठी एक ठरलेली प्रक्रिया असते. निवडणुकीचे अंतिम निकाल लागल्यानंतर पक्ष नेतृत्वाचा प्रतिनिधी नव्याने निवडून आलेल्या आमदारांची मते जाणून घेतो आणि त्यानंतर अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेतो. त्यांच्या या विधानावरून सध्या मुख्यमंत्रीपदासाठी सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
