Raghav Chadha : एअरलाईन्सची लूट ते ट्रॅफिक जाम; चड्ढांच्या प्रश्नांनी सरकार हादरलं अन् आता पद गेलं

Raghav Chadha यांनी जनतेसाठी मांडलेल्या मुद्द्यांमुळे त्यांची प्रतिमा केवळ 'आप'चे नेते म्हणून नाही, तर 'कॉमन मॅनचे खासदार' म्हणून तयार झाली.

Raghav Chadha : एअरलाईन्सची लूट ते ट्रॅफिक जाम; चड्ढांच्या प्रश्नांनी सरकार हादरलं अन् आता पद गेलं

Raghav Chadha : एअरलाईन्सची लूट ते ट्रॅफिक जाम; चड्ढांच्या प्रश्नांनी सरकार हादरलं अन् आता पद गेलं

Raghav Chadha removed as AAP’s Rajya Sabha deputy leader : संसदेच्या सभागृहात सामान्यांचे प्रश्न मांडणारा एक तरुण चेहरा जो कधी पितृत्व रजेचा अधिकार मागतो, तर कधी विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाची काळजी करतो. आम आदमी पार्टीचे आक्रमक खासदार राघव चड्ढा सध्या चर्चेत आहेत, पण ते त्यांच्या भाषणांमुळे नाही, तर त्यांच्याकडून हिरावून घेतलेल्या ‘राज्यसभेच्या उपनेतेपदा’ मुळे. त्यांच्यावरील कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळात एकच प्रश्न उपस्थित झालाय तो म्हणजे चड्ढांनी संसदेत मांडलेले जनतेचे प्रश्न आणि त्यातून वाढलेली त्यांची लोकप्रियता त्यांच्याच पक्षाला खटकू लागली का? आतापर्यंत राघव चड्ढा यांनी संसदेत मांडलेले प्रश्न कोणते ज्यांची चर्चा देशभरत झाली त्याबद्दल जाणून घेऊया…

संसदेत गाजलेले राघव चड्ढांचे ‘टॉप’ 5 जनहितार्थ मुद्दे

आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी आपल्या भाषणांमधून मध्यमवर्गीयांच्या खिशाला आणि हक्कांना स्पर्श करणारे अनेक विषय लावून धरले. त्यांचे हे 5 मुद्दे देशभरात चर्चेचा विषय ठरले.

1. पितृत्व रजा काळाची गरज

मुलाच्या संगोपनात केवळ आईचीच नाही, तर वडिलांचीही समान जबाबदारी असते, हा विचार चड्ढा यांनी प्रकर्षाने मांडला. “एका पित्याला आपल्या नवजात बाळाची देखभाल आणि नोकरी यांपैकी एकाची निवड करावी लागू नये,” असे म्हणत त्यांनी पितृत्व रजेला कायदेशीर अधिकार देण्याची मागणी केली. या मुद्द्यामुळे कॉर्पोरेट आणि सरकारी क्षेत्रात एका नव्या सामाजिक बदलाची चर्चा सुरू झाली.

2. एअरलाईन्सकडून होणारी ‘लूट’ आणि प्रवाशांचे हक्क

विमान प्रवासातील विसंगतीवर चड्ढा यांनी थेट नागरी उड्डाण मंत्र्यांना धारेवर धरले होते. या मुद्द्यावर संसदेत बोलताना जर प्रवाशांचे सामान काही ग्रॅमने जास्त भरले तर, एअरलाईन्स लगेच दंड वसूल करतात, मग जेव्हा विमान तासनतास उशिरा येते, तेव्हा प्रवाशांना नुकसानभरपाई का मिळत नाही? असा रोकडा सवाल त्यांनी नागरी उड्डाण मंत्र्यांना विचारला होता. चड्ढा यांच्या या प्रश्नाने विमान प्रवाशांच्या हक्कांसाठी एक मोठी लढाई उभी केली.

3. ट्रॅफिकचा विळखा आणि ‘नॅशनल मिशन’ची मागणी 

 मुंबई, दिल्ली, पुणे आणि बंगळुरू सारख्या शहरांमधील ट्रॅफिकची समस्या त्यांनी आकडेवारीनिशी मांडली. ते म्हणाले की, शहरातील लोक वर्षाचे सरासरी 100 ते 160 तास फक्त ट्रॅफिकमध्ये घालवतात, असे सांगत चड्ढा यांनी देशात ‘नॅशनल अर्बन डी-कंजेशन मिशन’ सुरू करण्याची मागणी केली, जेणेकरून इंधन, वेळ आणि उत्पादकता वाचवता येईल.

4. मोबाईल डेटा: ‘पैसे पूर्ण, मग डेटा लॅप्स का?

टेलिकॉम कंपन्यांच्या मनमानीवर त्यांनी मोठा प्रहार केला. “ग्राहक डेटासाठी पूर्ण पैसे मोजतात, मग दिवसाच्या अखेरीस न वापरलेला डेटा लॅप्स का होतो?” असा सवाल त्यांनी केला. चड्ढा यांच्या या प्रश्नाचा असा परिणाम झाली की टेलिकॉम मंत्रालयाने कंपन्यांना 30 दिवसांची वैधता असलेले प्लॅन देण्याचे बंधनकारक केले, ज्याचा थेट फायदा कोट्यवधी युजर्सना झाला.

5. गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे संरक्षण

पश्चिम आशियातील युद्धामुळे होणाऱ्या घसरणीतून मध्यमवर्गीय गुंतवणूकदार आणि SIP होल्डर्सना वाचवण्यासाठी त्यांनी विशेष सवलतींची मागणी केली. शिवाय फसव्या जाहिरातींचा मुद्दा उपस्थित करत फळांच्या रसाच्या नावाखाली ‘साखरयुक्त पेये’ विकणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाईची मागणी करत चड्ढा यांनी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न संसदेत उपस्थित केला होता.

लोकप्रियता की राजकीय रणनीती?

राघव चड्ढा यांनी जनतेसाठी मांडलेल्या कळीच्या मुद्द्यांमुळे त्यांची प्रतिमा केवळ ‘आप’चे नेते म्हणून नाही, तर ‘कॉमन मॅनचे खासदार’ म्हणून तयार झाली. सोशल मीडियावर त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले. पण, हीच लोकप्रियता आता त्यांच्या पदासाठी ‘अडथळा’ ठरली का? असा कयास लावला जातोय. सहसा राजकीय पक्षांमध्ये एखाद्या नेत्याची वैयक्तिक लोकप्रियता जेव्हा पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वापेक्षा मोठी वाटू लागते, तेव्हा असे फेरबदल केले जातात. राज्यसभेच्या उपसभापतिपदावरून त्यांना हटवण्यामागे नक्की काय कारण आहे, हे ‘आप’ने स्पष्ट केलेले नाही, पण सर्वसामान्यांच्या हितसाठी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यावरील राघव चड्ढांची जनहितार्थ भाषणं आता त्यांच्याच अंगलट आली का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

‘आप’मध्ये फेरबदल की अंतर्गत संघर्ष?

राघव चड्ढा यांनी मांडलेले मुद्दे सरकारला धारेवर धरणारे होते. पण हे मुद्दे मांडणे त्यांना भारी पडले की पक्षांतर्गत समीकरणांमुळे हे पद गेले, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. “जनतेचे प्रश्न मांडणे राघव चड्ढांना महागात पडले का?” हा प्रश्न आता प्रत्येक राजकीय गल्लीत विचारला जात आहे.
राघव चड्ढा यांच्याकडून उपनेतेपद गेले असले, तरी त्यांनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे अद्यापही सामान्य जनतेच्या मनात जिवंत आहेत. पदावरून हटवल्यामुळे त्यांची लोकप्रियता कमी होईल की ते अधिक प्रबळ होऊन लोकांचे प्रश्न मांडतील, हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी, ‘जनतेचे प्रश्न’ आणि ‘राजकारण’ यांच्यातील या लढाईत राघव चड्ढा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत.

Exit mobile version