Gen Z Unfollow चा जबरदस्त फटका; राघव चड्ढा यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स 1.46 कोटींवरून 1.35 कोटींवर
काहींनी याला नवीन राजकीय सुरूवात म्हटले, तर अनेकांनी या निर्णयावर टीका करत संधीसाधू राजकारण असे मत व्यक्त केले.
Raghav Chadha’s Instagram followers decrease : राष्ट्रीय राजधानीच्या राजकारणात मोठा बदल घडल्याची चर्चा सुरू आहे. राघव चड्ढा यांनी आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यांच्या सोबत सहा राज्यसभा खासदारांनी देखील पक्षांतर केल्याचे बोलले जात असून, त्यामुळे आपला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या घडामोडींची चाहूल लागली होती. विशेषतः राज्यसभेतील उपनेतेपदावरून त्यांना हटवण्यात आल्यानंतर अरविंद केजरीवाल आणि चड्ढा यांच्यात दुरावा वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
दरम्यान, या घडामोडींवर सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी याला नवीन राजकीय सुरूवात म्हटले, तर अनेकांनी या निर्णयावर टीका करत संधीसाधू राजकारण असे मत व्यक्त केले.
इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये मोठी घट
पक्षांतराच्या चर्चेनंतर सोशल मीडियावर देखील चड्ढा यांना फटका बसल्याचे चित्र आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, अवघ्या 24 तासांत त्यांच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरील फॉलोअर्समध्ये 10 लाखांहून अधिक झाली. शुक्रवारी त्यांचे फॉलोअर्स सुमारे 1.46 कोटी होते, जे शनिवारी दुपारी 2 वाजेपर्यंत घटून 1.35 कोटींवर आले.
एनसीपी नेत्याचा दावा
या पार्श्वभूमीवर अनिश गावंडे यांनी दावा केला की Gen Z Unfollow मोहिमेमुळे ही मोठी घट झाली. त्यांनी म्हटले की, इंटरनेट एखाद्याला रातोरात हिरो बनवू शकते आणि तितक्याच वेगाने शून्यावर देखील आणू शकते. गेल्या काही वर्षांत चड्ढा यांनी तरुणांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी पितृत्व रजा, ट्रॅफिक समस्या, टेलिकॉम डेटा मर्यादा, विमानतळावरील महाग अन्नपदार्थ आणि गिग वर्कर्सचे प्रश्न असे अनेक मुद्दे प्रभावीपणे मांडले.
गिग वर्कर्सच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी ब्लिंक इट मध्ये डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम केल्याची घटना विशेष चर्चेत राहिली होती. तसेच, 10 मिनिटांच्या डिलिव्हरी मॉडेलविरोधातील चर्चांनंतर केंद्र सरकारने काही नियमांमध्ये बदल केल्याचेही बोलले जाते, ज्याचा संबंध त्यांच्या मोहिमेशी जोडला गेला. राज्यसभा मध्येही त्यांनी तरुणांशी संबंधित प्रश्न जोरदारपणे मांडले होते. त्यामुळे पारंपरिक राजकारण आणि तरुणांच्या अपेक्षांमधील दरी कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला.