लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रयागराज येथे ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत देशातील रोजगार, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ‘आज मी तुमच्यासोबत वेदना, डेटा आणि दौलत यावर चर्चा करण्यासाठी आलो आहे,’ असे सांगत त्यांनी भारताकडे जगातील सर्वात मोठी युवा शक्ती असून हीच देशाची खरी ताकद असल्याचे म्हटले. अमेरिका, चीन आणि रशियातील तरुणही भारताच्या तरुणाईच्या सामर्थ्यापुढे काहीच नाहीत, असा दावा त्यांनी केला. देशातील 1 हजार तरुणांपैकी केवळ 12 जणांना कायमस्वरूपी नोकरी मिळत असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले.
भारतात रोजगाराच्या संधींचे मार्ग बंद करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. विद्यार्थी शिक्षणासाठी मोठा खर्च करतात, मेहनत घेतात. मात्र, त्यानंतर त्यांना रोजगार मिळत नाही. आज जगभरात ‘मेड इन चायना’ आणि ‘मेड इन बांग्लादेश’ची उत्पादने दिसतात; मात्र ‘मेड इन इंडिया’ पुरेशा प्रमाणात दिसत नाही, असे ते म्हणाले. नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा परिणाम रोजगारावरही झाला. सरकारी नोकऱ्यांच्या भरती परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असल्याचे सांगत 150 तरुणांमागे केवळ एका युवकाला नोकरी मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.
सैनिक शाळांमधील कथित संघाच्या सहभागावर संसदीय समितीत चर्चा; राहुल गांधींचा आरोप
भारताची सर्वात मोठी ताकद देशातील 40 कोटी युवक असून त्यांच्या क्षमतेचा योग्य वापर झाला तर भारताला मोठी प्रगती साधता येईल, असे राहुल गांधी यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलताना त्यांनी युवकांच्या डेटाच्या महत्त्वावर भर दिला. ‘तुमच्या डेटाशिवाय एआयला काही अर्थ नाही,’ असे ते म्हणाले. इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थी मोठा खर्च करतात. मात्र, केवळ पदवी किंवा प्रमाणपत्र मिळाल्याने रोजगाराची हमी मिळत नाही. एआयची जगभर चर्चा होत असली तरी ते मोठ्या प्रमाणावर लोकांच्या डेटावर आधारित असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमात बिहार आणि उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव मांडले. बिहारमधील पाटणा येथून आलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करत त्यावेळचे अनुभव सांगितले. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांनंतर राहुल गांधी यांनी देशातील युवकांच्या समस्या, रोजगाराच्या संधी आणि त्यांच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांवर संवाद साधला.
