उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणानंतर कार्यक्रमस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेवरून राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. या प्रकाराला अस्पृश्यतेचं उदाहरण ठरवत राहुल गांधी यांनी संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राहुल गांधी यांनी खरगे यांचा संदर्भ देत म्हटलं की, काँग्रेस अध्यक्षांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं आहे. मात्र, ते मंदिरात गेल्यानंतर शुद्धीकरण केलं जातं, ही अत्यंत गंभीर बाब आहे. 8 ऑगस्टला खरगे मंदिरात गेले आणि 10 ऑगस्टला मंदिराचं शुद्धीकरण करण्यात आलं, असा दावा राहुल गांधी यांनी केला. या घटनेला 20 दिवस उलटूनही कारवाई झालेली नाही, असा आरोप करत संबंधितांवर तातडीने FIR दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सोनिया गांधींचे आत्मचरित्र भारतात प्रकाशित करण्यापासून पेंग्विनची माघार; संपादकीय बदलांवरून वाद
देशात आजही दलित समाजाला भेदभावाचा सामना करावा लागत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. शाळांमध्ये मुलांना झाडू मारायला लावणं, विहिरीचं पाणी वापरण्यास मज्जाव करणं, चहाच्या दुकानांमध्ये वेगवेगळे कप ठेवणं तसंच दलितांना लग्नाच्या मिरवणुकीत घोड्यावर बसण्यास विरोध करणं, अशा घटना अद्याप घडत असल्याचं त्यांनी सांगितलं. बिहारचे मुख्यमंत्री मांझी मंदिरात गेल्यानंतरही अशाच प्रकारच्या शुद्धीकरणाची घटना घडल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
राहुल गांधी यांनी यावेळी देशात दोन विचारधारांमध्ये संघर्ष सुरू असल्याचं म्हटलं. एका बाजूला संविधानाची विचारधारा असून दुसऱ्या बाजूला भाजप-आरएसएसची विचारधारा असल्याचा दावा त्यांनी केला. अस्पृश्यता हा गुन्हा असून पंतप्रधान प्रत्येक जातीच्या लोकांसोबत असल्याचं सांगत असतील, तर त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्ये आणि कृत्ये कशी होऊ शकतात, असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. हल्द्वानीतील घटनेत न्याय मिळावा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
