रायपूर : भारत जोडो यात्रेत (India Jodo Yatras) जनतेसोबत संवाद साधल्यानंतर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज काँग्रेसच्या अधिवेशनातील उपस्थितांना जनतेला संबोधित केलं. छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये सध्या काँग्रेसच्या 85 व्या अधिवेशन (85th Session of Congress) सुरू आहे. या अधिवेनाच्या आज तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी राहुल गांधींनी 32 मिनिटांचे भाषण केले. या भाषणात राहुल यांनी भारत जोडो यात्रा, अदानी हिंडेनबर्ग प्रकरण, जयशंकर यांचे चीनवरील वक्तव्य तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी राहूल गांधींनी त्यांच्या लहानपणातला किस्सा सांगितला. ते म्हणाले, मी 1977 मध्ये 6 वर्षांचा होतो. निवडणूक आली, मला त्यावेळी निवडणुकामधलं काही कळत नव्हतं. घरात विचित्र वातावरण होतं. मी आईला विचारले की, काय झाले मम्मी? त्यावर आई म्हणाली की, आपण घर सोडत आहोत. तोपर्यंत मला घर आपल वाटत होतं. मी आईला विचारले की आपण घर का सोडतोय? आईने मला पहिल्यांदा सांगितले की, हे आपले घर नाही. हे सरकारचे घर आहे. आता इथून निघायचे आहे. मी कुठे जायचे? असं तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली, नाही माहिती कुठे जायचे ते. आईचं हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मला वाटत होतं की, ते आमचं घर आहे. आज 52 वर्षे झाली माझ्याकडे घर नाही. आजपर्यंत नाही, असं राहुल यांनी सांगितलं.
1. जेव्हा मिठी मारायचो, तेव्हा ट्रान्समिशनसारखे व्हायचे
राहुल गांधींनी यावेळी काही भारत जोडो यात्रेतीलही अनुभव सांगितले. ते म्हणाले, आम्ही कन्याकुमारी ते श्रीनगर अशी चार महिने भारत जोडो यात्रा केली. तुम्ही व्हिडिओमध्ये माझा चेहरा पाहिला, पण लाखो लोक आमच्यासोबत पायी चालले. आम्ही पाऊस, ऊन, आणि बर्फात एकत्र फिरलो. खूप काही शिकायला मिळाले. पंजाबमध्ये एक मेकॅनिक येऊन मला भेटला हे तुम्ही पाहिले असेल. मी त्याचा हात धरला आणि मी त्याची वर्षांची तपश्चर्या, त्याची वेदना आणि दु:ख ओळखले. लाखो शेतकर्यांशी हस्तांदोलन करायचो, मिठी मारली की लगेच एक ट्रान्समिशन व्हायचे.
सुरुवातीला तुम्ही काय करता, तुम्हाला किती मुले आहेत, अडचणी काय आहेत यावर बोलण्याची गरज होती. हा प्रकार दीड महिना चालला आणि त्यानंतर काही बोलायची गरज नव्हती. हात धरून, मिठी मारताच त्यांची वेदना एका सेकंदात समजत होती. काही न बोलता मला काय बोलायचे ते त्यांना कळून यायचे.
2. यात्रा सुरु केली मग जुने दुखणे सुरु झाले
राहुल गांधी म्हणाले, ‘तुम्ही बोटीची शर्यत पाहिली असेल. मी बोटीत बसलो होतो. माझ्या पायात तीव्र वेदना होत होत्या. त्या फोटोत मी हसत होतो, पण मनातल्या मनात रडत होतो. मी प्रवास सुरू केला. मी एक तंदुरुस्त माणूस आहे. 10-12 किलोमीटर सहज धावतो. 20-25 किमी चालण्यात काय मोठी गोष्ट आहे याचा अभिमान वाटला होता.
ही जुनी जखम होती. कॉलेजमध्ये फुटबॉल खेळताना दुखापत झाली होती. मी धावत होतो, तेव्हा जखम झाली. ती वेदना नाहीशी झाली होती. मी यात्रा सुरू करताच, वेदना परत होऊ लागली. तुम्ही माझे कुटुंब आहात त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की, मी सकाळी उठल्यानंतर विचार करायचो की, आता चालायचे कसे. त्यानंतर विचार यायचा 25 किलोमीटर नाही तर 3 हजार 500 किलोमीटर चालायचे आहे, कसे चालणार?
मग कंटेनरमधून खाली उतरून चालणे सुरु करत होतो. लोकांना भेटायचो. पहिल्या 10-15 दिवसांत अहंकार आणि गर्व नाहीसा झाला. कारण भारत मातेने संदेश दिला होता की, तू कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चालण्यासाठी निघाला आहेस तर हृदयातून अहंकार काढून टाक. नाहीतर चालू नका. मला हे ऐकावे लागले. ते न ऐकण्याची ताकद माझ्यात नव्हती.’
कसब्यात राडा, भाजपच्या बीडकरांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
3. लोकांच्या वेदना मी सांगू शकत नाही
राहुल म्हणाले, ‘यात्रेत माझ्यासोबत अनेकजण होते. लाखो लोक होते. मी विचार करत होतो, मी काय करत आहे. या सगळ्याचा उद्देश काय आहे? तेव्हा मी माझ्या ऑफीसमधील सहकाऱ्यांना बोलावले. त्यांना विचारलं की, गर्दी आहे तर धक्का लागेल, जखमा होतील. आता माझ्या आजूबाजूला जी 20-25 फुटांची जागा आहे, तेच आपले घर आहे. हे घर आपल्यासोबत चालेल. पहाटे 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे घर सोबत चालेल.
मी सर्वांना सांगितले की, या घरात जो कुणी येईल, मग तो गरीब असो वा श्रीमंत, तरुण असो वा बालक, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही राज्याचा असो, देशी असो की विदेश, प्राणीही असला तरी त्याला आपल्या घरी आल्याचे समाधान मिळाले पाहिजे. तो जेव्हा येथून जाईल, तेव्हा त्याच्या मनात स्वतःचे घर सोडून जात असल्याची भावना निर्माण झाली पाहिजे. देशातील नागरिकांनी – महिलांनी या देशाविषयी मला जे सांगितले, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. तरुणांच्या वेदना मी तुम्हाला समजावून सांगू शकत नाही’
4. महिलेने हात धरला तेव्हा मी माझ्या बहिणीला जे प्रेम देतो तेच प्रेम दिले
राहुल गांधी म्हणाले, “एक महिला जवळ आली, मी तिचा हात धरला आणि मला समजले की काहीतरी गडबड आहे. मी माझ्या बहिणीवर ज्याप्रमाणे प्रेम करतो तसेच तिला दिले. ती मला म्हणाली, “राहुल भैया, मी तुला भेटायला आले आहे. माझा नवरा मला मारतोय.” मला हे ऐकायला मिळाले. माझे कुटुंब काही वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमधून स्थलांतरित झाले. मला वाटले की कन्याकुमारीपासून मी माझे घर काश्मीरपर्यंत नेत आहे आणि येथे मी माझ्या घरी परत जात आहे, असं वाटलं.
5. मोदीजींनी 15-20 लोकांसह लालचौकात तिरंगा फडकावला, आम्ही लाखो लोकांसह
राहुल म्हणाले, “नरेंद्र मोदीजींनी भाजपच्या 15-20 लोकांसह लाल चौकात ध्वजारोहण केले, भारत जोडो यात्रेने लाखो लोकांसह झेंडा फडकवला, पंतप्रधानांना समजले नाही. एक काश्मिरी आला आणि म्हणाला, मी तुझ्यासोबत तिरंगा घेऊन चालत आहे. तुम्ही आमच्या हृदयात निर्माण केलेला विश्वास. त्याच्यामुळे मी सोबत चालत आहे. भारत यात्रेत लाखो लोक सामील झाले, हे काम राहुल गांधींनी केले नाही, आपल्या कार्यकर्त्यांनी केले.”
6. बलवानांसमोर झुकण्याची सावरकरांची विचारधारा
एका मंत्र्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, चीनची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा मोठी आहे, मग आपण त्यांच्याशी कसे लढू शकतो.? इंग्रजांशी लढताना आपली अर्थव्यवस्था त्यांच्यापेक्षा मोठी होती का? तुम्हाला बलवानाशी लढायचे नाही का? अशा वागण्याला भ्याडपणा म्हणतात. जो आपल्यापेक्षा बलवान आहे त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे ही सावरकरांची विचारसरणी आहे. भाजप हीच विचारधारा पुढे घेऊन जात आहे. तुमची इकॉनॉमी आमच्यापेक्षा मोठी आहे म्हणून आम्ही तुमच्यासोबत लढू शकत नाही, असं भाजप चीनला म्हणतेय. ही कोणती देशभक्ती आहे? हाच तुमचा राष्ट्रवाद आहे का? जो कमजोर आहे. त्याला मारा आणि जो मजबूत आहे त्याच्या समोर झुका हीच का तुमची देशभक्ती?, सवालही त्यांनी केला.
दरम्यान, महात्मा गांधी सत्याग्रहाबद्दल बोलत असत. सत्याचा मार्ग कधीही सोडू नका. त्याचा अर्थ सत्याचा मार्ग कधीच सोडू नका असा आहे. संघ आणि भाजपसाठी मी नवा शब्द देत आहे. आम्ही सत्यग्राही आहोत. तर भाजपवाले सत्ताग्राही आहेत. ते सत्तेसाठी कुणाशीही हातमिळवणी करू शकतात. कुणापुढेही झुकू शकतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
7. भाजप आणि संघ अदानींना का संरक्षण देत आहेत
एका उद्योगपतीविरुद्ध मी संसदेत मोर्चा उघडला. मी एक फोटो दाखवला ज्यात मोदीजी अदानीसोबत विमानात बसले आहेत. मी विचारले काय संबंध आहे. संपूर्ण सरकार, सर्व मंत्री अदानीजींना संरक्षण देऊ लागले. अदानींवर हल्ला करणारा देशद्रोही झाला आणि अदानी देशभक्त झाला. त्या व्यक्तीला भाजप आणि संघ संरक्षण देत आहेत. तुम्ही का संरक्षण करत आहात हा प्रश्न आहे. हजारो कोटी रुपये भारतात पाठवणाऱ्या या शेल कंपन्या कोणाच्या आहेत? यात पैसा कोणाचा आहे? तपास का होत नाही? जेपीसी का स्थापन होत नाही.