इंडिगो विमान कंपनीचे सर्व उड्डाणं रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट
सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनीला ऑपरेशनल समस्यांशी गंभीरपणे झुंजावे लागत असून प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे.
इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द (Indigo) केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस स्टँडसारखी झाली असून, प्रवाशांची मोठी गर्दी विमानतळावर पाहायला मिळत आहे. इंडिगाने पत्रक जारी करत प्रवाशांची माफी देखील मागितली आहे. मात्र, अचानक विमानसेवा खंडीत झाल्याने पुणे, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळुरू येथील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
या विमातळावरुन दुसरीकडे मार्गस्थ होणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यातच, पुण्याहून मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे ते मुंबई विमान प्रवास करण्यासाठी तब्बल 61 हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे, प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. इंडिगो एरलाईन्स कंपनीच्या ऑपरेशन समस्यांमुळे इतर विमान कंपन्यांनी आपल्या तिकीट दरात अचानक वाढ केली आहे.
Indigo Airline : 434 विमाने, 10,000 क्रू पण तरीही सेवा रद्द; अचानक इंडिगो संकटात का?
या वाढीनुसार, पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट 61 हजार रुपयांवर पोहोचले आहे. तर, पुणे ते दिल्ली विमानाचे तिकीट 27 हजार आणि पुण्याहून बंगळुरूसाठी 49 हजार रुपये प्रवाशांना मोजावे लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईहून लंडनला जाण्यासाठी किमान प्रिमियम इकॉनॉमीचे तिकीट 50 हजार ते 70 हजार रुपयांपर्यंत आहेत. तर, मुंबईहून थायलंडसाठी 15 ते 30 हजार रुपयांपर्यंत विमान भाडे आकारले जाते. मात्र, इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे पुणे ते मुंबई विमानाचे तिकीट चक्क 61 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
सलग चौथ्या दिवशी इंडिगो कंपनीला ऑपरेशनल समस्यांशी गंभीरपणे झुंजावे लागत असून प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे. विमान उड्डाणाची संख्या कमी झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांची तिकिटं मात्र चौपट दराने विकली जात आहेत. देशभरातून इंडिगोची तब्बल 600 हून अधिक विमाने आज रद्द करण्यात आली आहेत. त्यामध्ये राजधानी दिल्लीतून आज रात्री 11.59 वाजेपर्यंत इंडिगोचे एकही विमान उड्डाण होणार नाही, असं पत्रच कंपनीने जारी केलं आहे.
दरम्यान, रद्द होणाऱ्या विमानांची ही संख्या गेल्या दिवसांपेक्षाही जास्त असल्याने प्रवाशांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे, प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी (DEL) निघणाऱ्या सर्व इंडिगो देशांतर्गत विमानांची उड्डाणे रात्री 11.59 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. या अनपेक्षित निर्णयाचा गंभीर फटका बसलेल्या आमच्या सर्व मौल्यवान प्रवासी, ग्राहकांची आणि भागधारकांची आम्ही मनापासून माफी मागतो, असे इंडिगोने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
— IndiGo (@IndiGo6E) December 5, 2025
