Rahul Gandhi in Bihar Vote Chori : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशात मत चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला. आरोप करून ते थांबले नाही. त्यांनी कर्नाटकातील मत चोरीसाठी पुरावा समोर आणला. (Vote Chori) महाराष्ट्रात मत चोरीचा दावा केला. आता राहुल गांधी निवडणूक तोंडावर असलेल्या बिहारमध्ये उतरले आहेत. बिहार विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यापूर्वी त्यांनी नितीशबाबू आणि भाजपाविरोधात प्रचाराचा नारळ फोडला. सासाराम येथे सभेला संबोधित करताना त्यांनी मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला.
राहुल गांधी यांनी सासाराम येथील सुआरा विमानतळाच्या परिसरात सभा घेतली. राहुल गांधी यांनी मित्र पक्षासोबत आजपासून बिहारमध्ये व्होटर अधिकार यात्रेचा शुभारंभ केला. त्यांनी आज या यात्रेचा रोख आणि उद्देश काय असेल याची चुणूक दाखवली. काँग्रेस निवडणूक आयोगासह भाजपला जेरीस आणणार हे नक्की मानण्यात येत आहे. थोड्याच वेळात निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत त्यांची बाजू मांडणार आहे. त्यापूर्वीच राहुल गांधींनी मत चोरीवरून पुन्हा निवडणूक आयोगाला घेरलं आहे.
तरुणांना नोकरी नाही फक्त घोषणा मिळणार,राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दबावात येऊन जाती जनगणना करण्याचे जाहीर केले, असे राहुल गांधी म्हणाले. पण मला माहिती आहे ते खरी जाती जनगणना करू शकणार नाही, ते करणार पण नाहीत. ओबीसींसाठी जी 50 टक्क्यांची भिंत आहे, ते ती तोडू शकत नाहीत, असा दावा राहुल गांधींनी केला. पण संपूर्ण देशात काँग्रेस आणि आघाडी जाती जनगणना करेल आणि 50 टक्के आरक्षण मर्यादेची जी भिंत आहे ती तोडणार असल्याचे राहुल गांधींनी जाहीर केले.
राहुल गांधी यांनी मत चोरी सोबतच बिहार निवडणुकीत जात जनगणनेचे कार्ड पण पिसले आहे. त्यामुळे या मुद्दावर पण मोदी सरकारला राहुल गांधी आणि आघाडी घेरण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट होत आहे. राहुल गांधी यांनी ओबीसी कार्ड बाहेर काढल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यावर भाजपने टीका केली. नंतर देशात किती टक्का ओबीसी आहे हे समजण्यासाठी जाती जनगणना करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. तर जातीजनगणना योग्य पद्धतीने केली जाणार नसल्याचा अगोदरच आरोप करून राहुल गांधी यांनी सरकारच्या हेतूवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.