कर्नाटक (Karnataka) निवडणुकीचे निकाल लागून ३ दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या नावावार निर्णय घेऊ शकलेला नाही. नेमकं मुख्यमंत्री कोण होणार या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बंगळुरुमधील अनेक बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सध्या २ नावे आघाडीवर आहेत. यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नावांवर दिल्लीत खलबत सुरु आहेत. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांच्या मॅरॅथॉन बैठका सुरू आहेत. (Disagreement among top leaders over the names of Karnataka Chief Minister on Siddaramaiah and party state president DK Shivakumar)
अशात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल यांनी त्यांचे मत सिद्धरामय्या यांच्या पारड्यात टाकलं आहे. बहुतांश आमदार देखील सिद्धरामय्या यांच्यासोबत असल्याचे मानले जात आहे. तर सोनिया गांधी यांचे मत डी. के. शिवकुमार यांच्यासाठी अनुकुल आहे. दुसऱ्या बाजूला मल्लिकार्जुन खरगे अद्याप निर्णयापर्यंत पोहोचलेले नाहीत. सर्व नेत्यांशी चर्चा करूनच ते त्यांचे मत सांगणार आहेत. रणदीप सुरजेवालाही या दोन्ही नेत्यांबाबत तटस्थ आहेत. त्यामुळेच या दोन नेत्यांच्या निवडीबाबत पक्षातील प्रमुख नेत्यांची मते भिन्न असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांच्यावर मुख्यमंत्रीपदाच्या निवडीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिंदे यांच्यासह इतर २ नेत्यांना निरीक्षक म्हणून कर्नाटकमध्ये पाठविण्यात आले होते. यावेळी तिन्ही निरीक्षकांनी कर्नाटकातील पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित 135 आमदारांचे मत जाणून घेतले. त्यानंतर रविवारी (१४ मे) रात्री मुख्यमंत्र्यांच्या नावावर गुप्त मतदान झाले. आमदारांच्या ओपिनियन पोलनंतर सोमवारी 3 निरीक्षकांनी मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन अहवाल आणि मतपेटी सादर केली.
काय आहे अहवालात?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश आमदारांनी सिद्धरामय्या यांना आपली पसंती दर्शविली आहे. मात्र डीके शिवकुमार यांनाही दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचे म्हटले आहे. शिवकुमार यांनी प्रत्येक वेळी पक्षाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काम केले आहे. एवढेच नव्हे तर, पक्षाने सोपवलेली प्रत्येक जाबाबदारी शिवकुमार यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केले आहे. त्यामुळे आता या अहवालाच्या आधारे खर्गे सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्याशी चर्चा करणार आहेत.
शिवकुमार यांच्या हातात सरकारच्या नाड्या :
काँग्रेसने कर्नाटकात सरकार स्थापनेचे 2 सुत्रं ठरवले आहेत. यात पहिला पर्याय म्हणजे सिद्धरामय्या यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली जाईल. तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद आणि इतर महत्वाची मंत्रीपद देण्यात येतील यासोबतच डीके शिवकुमार राज्यात पक्षाचेही नेतृत्व करतील. म्हणजेच ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही असतील.
अडीच वर्षांचा फॉर्म्युला :
नवनिर्वाचित आमदारांमध्ये सिद्धरामय्या यांचा वरचष्मा आहे, पण निवडणूक विजयात शिवकुमार यांची भूमिका दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही. अशा परिस्थितीत दोघांमध्ये सामंजस्य व्हावे यासाठी हायकमांड प्रयत्नशील आहे. त्यामुळेच या दोघांना प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री करण्याचाही पर्याय सुचिवला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यात सिद्धरामय्या यांना पहिली संधी मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे. परंतु राजस्थानचा अनुभव पाहता शिवकुमार सध्या कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही.