Rahul Gandhi Slams Gujarat Congress : काँग्रेस खासदार राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर (Rahul Gandhi) आहेत. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. नेहमीच भाजपवर सडकून टीका करणाऱ्या राहुल गांधींचं हे रुप पाहून काँग्रेस नेते देखील अवाक् झाले. राहुल गांधी यांनी गुजरात काँग्रेसमधील काही नेत्यांना चक्का भाजपाची बी टीम म्हणून संबोधित केले. अहमदाबाद येथील कार्यक्रमात भाजपला मदत होईल असे काम करणाऱ्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याचाही इशारा त्यांनी दिला.
मी काँग्रेस पार्टीचा सदस्य आहे आणि मीच म्हणतोय की गुजरातचा काँग्रेस पक्ष वाट दाखवण्यास असमर्थ आहे. मी ही गोष्ट कोणत्याही भितीपोटी बोलत नाही. पक्षाचे कार्यकर्ते असोत, राहुल गांधी असो, पक्षाचे महासचिव असोत किंवा आमचे पीसीसी अध्यक्ष असोत आम्ही सगळेच गुजराताला वाट दाखवण्यात असमर्थ आहोत अशी खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
गुजरातमधील व्यापारी, छोटे व्यावसायिक, शेतकरी, मजूर आणि विद्यार्थ्यांना आता पर्याय हवा आहे. त्यांनी बी टीम नकोय. पक्षात दोन गट पडले आहेत. त्यात विभागणी करणे ही माझी जबाबदारी आहे. पहिलं म्हणजे दोन गटांना वेगळे करावे लागेल. यासाठी कठोर कारवाई करावी लागेल. 10,15,20 किंवा 30 लोकांना काढावे लागले तरी त्यांना काढून टाकू. काँग्रेसमध्ये राहून भाजपसाठी काम करतात. त्या लोकांना पक्षाच्या बाहेर काढून खुलेपणाने काम करण्याची मोकळीक देऊ, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
पक्षातील काही मोठे नेते वेगवेगळ्या पातळीवर अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्यातही दोन प्रकारचे नेते आहेत. पहिले सरळ जनतेशी जोडलेले आहेत आणि त्यांचे मन काँग्रेसमध्येच आहे. दुसऱ्या प्रकारातील नेता जनतेपासून दूर गेलेले आहेत. नागरिकांचे काय मुद्दे आहेत याची त्यांना काहीच माहिती नाही. यातीलच निम्मे लोक असे आहेत जे भाजपसाठी काम करत आहेत असा थेट आरोप राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर केला.